वेलिंग्टन : डॅनियल व्हिट्टोरीनंतर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल मिल्स याने बुधवारी क्रिकेटमधील सर्व स्वरूपातून निवृत्ती जाहीर केली.मिल्स हा आपल्या १४ वर्षांच्या सोनेरी कारकिर्दीत नेहमीच टॉप टेनमध्ये वन-डे गोलंदाजात स्थान मिळवणारा आणि बऱ्याच कालावधीत नंबर वनवर राहणारा गोलंदाज आहे.तो म्हणाला, ‘‘देशासाठी १४ वर्षे क्रिकेट खेळणे खूप अभिमानाची बाब आहे; परंतु या खेळातून निवृत्ती घेऊन आपल्या कारकिर्दीत अनेक त्याग करणाऱ्या कुटुंबाला वेळ देण्याची ही योग्य वेळ आहे.’’मिल्सने न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करताना १७० वन-डेत २४० गडी बाद केले आहेत. व्हिट्टोरीनंतर न्यूझीलंडकडून सर्वाधिक बळी घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. व्हिट्टोरीने २९७ गडी बाद केले आहेत.मिल्सने तीन वर्ल्डकपमध्येही न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले आहे; परंतु न्यूझीलंड संघाने संघात जास्त बदल न केल्यामुळे नुकत्याच झालेल्या वर्ल्डकपमध्ये तो एकही सामना खेळला नाही. मिल्सने त्याच्या देशासाठी १९ कसोटी आणि टी-२0 चे ४२ सामनेदेखील खेळले आहेत. मिल्सने १९ कसोटींत ४४ गडी बाद केले आहेत, तर ४२ टी-२0 क्रिकेटमध्ये ४३ बळी घेतले आहेत. (वृत्तसंस्था)
लोकप्रतिनिधीच झाले कंत्राटदार
By admin | Published: April 02, 2015 1:30 AM