ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपण केलेल्या ऑस्ट्रेलिया खेळांडूंबाबतच्या वक्तव्याचा विपर्यास लावला गेला असल्याचं म्हटलं आहे. आपली अजूनही काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत चांगली मैत्री असल्याचं त्याने सांगितलं आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने आपण आता ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मित्र मानत नाही असं म्हटलं होतं. यानंतर त्याच्यावर ऑस्ट्रेलियन मीडियाने प्रचंड टीका केली होती.
मालिकेत विजय मिळवल्यानंतर आता स्टीव्ह स्मिथ आणि ऑस्ट्रेलियन संघासोबत मैत्रीची नवी सुरूवात करणार का ? असं विचारलं असता नाही "आता आधीसारखं काही राहिलं नाहीये, मीही आधी असाच विचार करायचो पण आता सर्व बदललं आहे. पहिल्या कसोटीनंतर मी जे बोललो होतो त्याबाबत मी पूर्णत: चुकीचा सिद्ध झालो. खेळाच्या वातावरणात तुम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून खेळायचं असतं, पण मी चुकीचा ठरलो. पहिल्या कसोटीनंतर मी जे बोललो होतो तसं पुन्हा बोलताना तुम्ही मला पाहणार नाही", असं कोहली बोलला होता.
1/2 My answer at the post match conference has been blown way out of proportion. I did not categorically say the whole Australian team but— Virat Kohli (@imVkohli) March 30, 2017
मात्र विराट कोहलीने ट्विटरच्या माध्यमातून स्पष्टीकरण देत आपण संपुर्ण ऑस्ट्रेलिया संघाला उद्देशून हे वक्तव्य केलं नव्हतं असं म्हटलं आहे. "माझ्या वक्तव्याचा विपर्यास लावला गेला. मी संपुर्ण ऑस्ट्रेलिया संघाला उद्देशून बोललो नव्हतो. काही ठराविक खेळाडूंबद्दल माझं मत होतं. अनेकांशी माझे चांगले संबंध असून आयपीएलमध्ये आरसीबीकडून आम्ही एकत्र खेळलो आहोत. आणि ते बदलणार नाही", असं विराटने ट्विट करत सांगितलं आहे.
2/2only a couple of individuals.I continue to be in good terms with the few guys I know & who I"ve played with at RCB & that doesn"t change.— Virat Kohli (@imVkohli) March 30, 2017
विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंबाबत केलेल्या या विधानावर ‘डेली टेलिग्राफ’ने विराटची प्रतिक्रिया बालिशपणा असल्याचे म्हटले असून, मालिका आटोपल्यानंतर बीअर पिण्याचे स्मिथचे आमंत्रणही विराटने उर्मटपणे फेटाळून लावल्याचे म्हटले आहे. कोहलीने मालिका संपल्यानंतर मोठ्या मनाने प्रतिस्पर्धी संघाशी हात मिळविला पाहिजे होता, पण तसे न करता आपण स्तरहीन असल्याचे त्याने सिद्ध केले, असे ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी म्हटले आहे. कोहली गर्विष्ठ असल्याचीही टीका करण्यात आली.
स्मिथने मुरली विजयबद्दल काढलेल्या अपशब्दांबद्दल जाहीरपणे माफीदेखील मागितली, मग रांची कसोटीतील कृत्याबद्दल कोहलीनेही माफी मागायला हवी होती. पण त्याने तसे काहीच केले नाही, असेही एका ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रात प्रकाशित झाले. टीकेबद्दल कोहलीचे चाहते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आवाज उठवला होता. भारतीय संघातील क्रिकेटपटूंनीही ऑस्ट्रेलियातील मीडियाकडून केल्या जाणाऱ्या टीकेला दुर्दैवी ठरवले होते. आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क यानेही आॅस्ट्रेलियन मीडियाचा कोहलीला बदनाम करण्याचा डाव आखल्याचे सांगत निशाणा साधला होता. असे असतानाही ‘द आॅस्ट्रेलियन’ने कोहलीला लक्ष्य केले. डीआरएस प्रकरणावरही स्मिथने स्पष्टीकरण दिले. कोहलीने मात्र स्मिथला दिलेल्या वागणुकीवर कुठलीही दिलगिरी व्यक्त केली नाही, हे दुर्दैवी नाही का? असा सवाल माध्यमांनी उपस्थित केला