बंगळुरू : माजी आॅल इंग्लंड चॅम्पियन प्रकाश पादुकोन यांनी शनिवारी पी. व्ही. सिंधू नजीकच्या भविष्यात जगातील नंबर वन खेळाडू बनू शकते, असे मत व्यक्त केले आहे. तथापि, सायना नेहवालचे प्रशिक्षक विमल कुमार यांच्यानुसार या दोघीही आॅलिम्पिकपदक विजेत्या खेळाडू असून, त्या पुढील पाच ते ६ वर्षांपर्यंत जागतिक बॅडमिंटनमध्ये दबदबा ठेवू शकतात.सायनाने लंडन आॅलिम्पिक २0१२ मध्ये कांस्यपदक जिंकले होते आणि आॅलिम्पिकपदक जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू बनली होती. सिंधूने यावर्षी रिओ आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले आणि ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती.येथे ज्युनिअर खेळाडूंसाठी आॅलिम्पिक गोल्ड क्वेस्टच्या कार्यशाळेदरम्यान पादुकोन यांनी निश्चितच सिंधू नंबर वन रँकिंग मिळविण्यात सक्षम असल्याचे सांगितले. तथापि, विमल यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. ते म्हणाले, ‘मी याविषयी मत व्यक्त करू शकत नाही. सिंधू व सायनासाठी हे चांगले आव्हान आहे. पुढील पाच ते सहा वर्षांत या दोन्ही खेळाडू जागतिक बॅडमिंटनमध्ये दबदबा बनवण्याची अपेक्षा आहे.’ सायनाच्या पायाची दुखापत बरी झाली असून, त्यातून सावरून तिने पुनरागमन केल्याबद्दल विमल यांनी आनंद व्यक्त केला.जर सिंधू आणि तिचे प्रशिक्षक गोपीचंद यांनी नियोजन करून स्पर्धेदरम्यान पुरेशा ब्रेक घेतल्यास हैदराबादची ही खेळाडू जगातील नंबर वन खेळाडू बनू शकते, असे पादुकोन यांना वाटते. ते म्हणाले, ‘हा निर्णय गोपी आणि तिने घ्यायचा आहे. जर त्यांनी योग्य विश्रांती आणि ट्रेनिंगची योजना केली तर ते स्पर्धेदरम्यान पुरेसे अंतर ठेवू शकतात व तसे झाल्यास सिंधू महिला एकेरीत नंबर वन बनू शकते.’ सिंधू युवा असून, ती कमीत कमी अजून सहा वर्षे बॅडमिंटन खेळू शकते. ते म्हणाले, ‘निश्चितच तिच्यात क्षमता आहे. तिच्यात कमीत कमी पाच ते सहा वर्षे चांगले बॅडमिंटन खेळण्याची क्षमता आहे आणि तिने सर्वच खेळाडूंना नमवले आहे.’
सिंधूविषयी विमलकुमार, पादुकोन यांच्यात मतभिन्नता
By admin | Published: December 25, 2016 3:22 AM