ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 30 - चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळण्यासाठी इंग्लंड दौ-यावर गेलेल्या भारतीय संघात सर्व काही आलबेल नसल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. कर्णधार विराट कोहलीसह काही वरिष्ठ खेळाडू मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेंवर नाराज आहेत. कुंबळे यांच्या मार्गदर्शनाची पद्धत वरिष्ठ खेळाडूंना पटत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारतीय संघ पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध चार जूनला होणा-या सामन्याची तयारी करत असताना संघात सर्वकाही आलबेल नसल्याची बातमी आली आहे.
बीसीसीआयच्या सल्लागार समितीवर असणारे सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या वादामध्ये कुंबळे आणि वरिष्ठ खेळाडूंमध्ये समेट घडवून आणतील अशी अपेक्षा आहे. सचिन, सौरव आणि लक्ष्मणच्या सल्लागार समितीनेच प्रशिक्षकपदी अनिक कुंबळेची निवड केली होती. भारतीय संघासाठी सध्या प्रशिक्षक निवडीची प्रक्रिया सुरु झाली असून, कुंबळे यांना यामध्ये थेट प्रवेश दिला आहे.
आणखी वाचा
2019 वर्ल्डकपपर्यंत कुंबळे यांना प्रशिक्षकपदावर कायम ठेवले जाण्याची शक्यता असताना आता अचानक हा वाद उभा राहिला आहे. मागच्या वर्षभरात कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने सर्वच कसोटी, एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत. सध्याच्या घडीला हा मोठा वाद नसला तरी, रवी शास्त्री यांच्या कार्यपद्धतीशी वरिष्ठ खेळाडूंना सहज जुळवून घेता येत होते त्यामुळे प्रशिक्षकपदासाठी त्यांच्या नावाला वरिष्ठ खेळाडूंची पसंती होती असे सूत्रांनी सांगितले.
बीसीसीआयचा कारभार पाहण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यासंबंधी सल्लागार समितीला भेटून या वादावर चर्चा करणार आहेत. रविवारी न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या सराव सामन्यानंतर कर्णधार कोहलीने गांगुलीशी चर्चा केली. बीसीसीआयमधील एका गटाने कुंबळे यांना मुदतवाढ देण्याचे समर्थन केले आहे. पण कोहली कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दीर्घकाळ खेळण्यास इच्छुक नसल्याने कुंबळे यांना लगेचच मुदतवाढ मिळू शकली नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा संपल्यानंतर कुंबळे यांचा बीसीसीआय सोबतचा करार संपुष्टात येणार आहे. प्रशासकीय समिती संघाच्या दैनंदिन बाबींमध्ये हस्तक्षेप करत नाही. नवा प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारी सल्लागार समितीवर आहे.