ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. ७ - आपला स्टार फुटबॉलपटू लायोनेल मेसी शिवाय खेळणा-या अर्जेंटिनाने कोपा अमेरिका स्पर्धेत गतविजेत्या चिलीवर २-१ ने विजय मिळवून तीन गुणांची कमाई केली. दुखापतीमुळे मेसी या सामन्यात खेळू शकला नाही. मेसीची अनुपस्थिती एंजल डी मारीयाने भरुन काढली.
त्याने विजयात निर्णायक ठरलेल्या दोन्ही गोलमध्ये महत्वाची भूमिका बजावली. सामन्याच्या ५१ व्या मिनिटाला एव्हर बानेगाकडून मिळालेल्या पासचे मारीयाने गोलमध्ये रुपानंतर केले. त्यानंतर आठ मिनिटांनी बानेगाला दुसरा गोल करण्यात मदत केली. चिलीच्या जोसे पेड्रोने एक्स्ट्रा टाईममध्ये ९३ व्या मिनिटाला गोल करुन आघाडी कमी केली. पण तो पर्यंत उशीर झाला होता.
या सामन्यात एकूण पाच यलो कार्ड दाखवण्यात आले. अर्जेंटिनाच्या डी मारीया आणि गॅरी मेडलला ६५ व्या मिनिटाला यलो कार्ड दाखवले. मागच्यावर्षी चिलीने अर्जेंटिनाला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-१ ने नमवून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकाले होते.
या विजयासह अर्जेंटिनाने कोपा स्पर्धेतील पराभवाची परतफेड केली. १९९३ पासून अर्जेंटिनाला एकही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही. २०१४ फुटबॉल वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत जर्मनीने त्यांचा पराभव केला होता. २४ मार्चला वर्ल्डकप पात्रता फेरीत अर्जेंटिनाने चिलीवर २-१ असा विजय मिळवला होता.