ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. ५ - फुटबॉल जगतातील बलाढय संघ म्हणून गणल्या जाणा-या ब्राझीलला कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या 'ब' गटातील सलामीच्या सामन्यात इक्वोडरने गोलशून्य बरोबरीत रोखले. ब्राझीलला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या पण विजयी गोलची संधी त्यांना साधता आली नाही.
आठवेळा कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावणा-या ब्राझीलने खेळाच्या दुस-या सत्रात लय गमावली. ब्राझीलच्या या कामगिरीमुळे सामना पहायला आलेले ५३,१५८ प्रेक्षकांची निराशा झाली. आपण सहज विजय मिळवू असा विश्वास असल्याने ब्राझीलने या सामन्यात कर्णधार नेयमारसह महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली होती.
गोल शून्य बरोबरीमुळे त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवली. ब्राझीलच्या फिलीपी काउटइनहोने कॉर्नरवर आणि ल्युकास लिमाला हेडरवर गोल करण्याची संधी गमावली. पासाडेनाच्या रोस बाऊल स्टेडियमवर हा सामना झाला.
१९९४ फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम फेरीत याच स्टेडियमवर ब्राझीलचा इटली विरुद्ध सामना झाला होता. ब्राझीलने २००७ साली शेवटची कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा जिंकली होती.