नवी दिल्ली : कोविड-१९ नंतरच्या परिस्थितीमध्ये विदेशी प्रशिक्षकांची सेवा घेणे अडचणीचे ठरेल आणि अशा स्थितीत माजी भारतीय खेळाडूंकडे ही उणीव भरून काढण्याची चांगली संधी राहील, असे मत विश्व बॅडमिंटन चॅम्पियन पी.व्ही. सिंधूने व्यक्त केले.
सिंधू वेबिनारदरम्यान बोलताना म्हणाली, ‘जर महामारी कायम राहिली तर विदेशातील प्रशिक्षकांना आणणे कठीण होईल. आपल्या देशात आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेले चांगले खेळाडू आहेत. त्यांचा प्रशिक्षक म्हणून उपयोग करता येईल.’ आॅलिम्पिक रौप्यपदक विजेता सिंधू आॅनलाईन सत्रादरम्यान भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या (साई) नवनियुक्त सहायक संचालकांना संबोधित करीत होती.
सिंधूने एक चॅम्पियन तयार करण्यात आई-वडील, प्रशिक्षक आणि प्रशासकांना एक संघ म्हणून काम करण्याचे महत्त्व विशद केले. सिंधू म्हणाली, ‘प्रशासकांना प्रत्येक खेळाडूंच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीची माहिती असायला हवी. भारतीय खेळांचे भविष्य तुमच्यासारख्या युवा क्रीडा प्रशासकांच्या हातात आहे. तुम्ही साईच्या विभागीय केंद्राचा कुठल्याही परिस्थितीमध्ये दौरा करायला हवा. तुम्हाला खेळाडूंच्या कामगिरीची माहिती असायला हवी. तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या संपर्कात असायला हवे. आई-वडिलांचे योगदान महत्त्वाचे असते. तुम्ही त्यांच्याकडून फीडबॅक घ्यायला हवा.
हा फीडबॅक लक्षात ठेवायला हवा.’ या २४ वर्षीय हैदराबादच्या खेळाडूने म्हटले की, वयाची लपवाछपवी करणाऱ्या खेळाडूंवर सातत्याने लक्ष ठेवायला हवे. साईची कोचिंग प्रणाली कशाप्रकारे कार्य करते, याची तुम्हाला माहिती असायला हवी. प्रत्येक केंद्रावर खेळाडूंना योग्य आहार मिळत आहे की नाही, याची माहिती नियमित घ्यायला हवी. सिंधू पुढे म्हणाली, ‘माझ्यापुढे आव्हान २०१५ मध्ये झालेल्या दुखापतीतून सावरण्याचे होते. मी अकादमीमध्ये राहूनच खेळत होती.
खेळाडूच्या यशामध्ये आई-वडिलांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगताना सिंधू म्हणाली, ‘रिओ आॅलिम्पिकपूर्वी आम्ही अकादमीमध्ये वास्तव्यास गेलो होतो. माझ्या आईने माझ्यासाठी नोकरी सोडली होती. माझ्या वडिलांनी दोन वर्षांची रजा घेतली होती.’ मला वर्षभरात २३ स्पर्धा खेळायच्या होत्या आणि आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवायची होती. माझे वडील रजेवर असल्यामुळे मला बरीच मदत झाली. ते मला रेल्वे मैदानापर्यंत घेऊन जात होते.’