नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी होईपर्यंत खेळाचे अर्थकारण बिघडणार आहे आणि त्यामुळे खेळाडूंना आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे, असे मत अभिनव बिंद्राने व्यक्त केले.ऑलिम्पिक चॅम्पियन नेमबाज बिंद्राने व्यावसायिक मुद्यावर चर्चा करताना म्हटले, ‘कोरोना व्हायरसमुळे खेळाच्या अर्थव्यवस्थेला सर्वाधिक फटका बसणार आहे. कारण यादरम्यान कुठली स्पर्धा होणार नाही. खेळाडूंना पैशाची उणीव भासेल.’बिंद्रा पुढे म्हणाला, ‘ही सर्वांत महत्त्वाच्या समस्यांपैकी एक समस्या राहणार आहे. त्यातून सावरण्यासाठी पैसा महत्त्वाचा घटक राहील. खेळाडूंना सराव सुरू ठेवण्यासाठी साधन व सहकार्य निश्चित करण्यासाठी पैसा महत्त्वाचा ठरेल.’खेळाने यापूर्वी जगाला युद्ध व नैसर्गिक आपत्तीच्या काळात मोठी मदत केली आहे. आताही खेळ सकारात्मक भूमिका बजावू शकतो, पण संतुलन साधल्यानंतरच हे घडू शकते.’ भारतातील एकमेव वैयक्तिक आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेता बिंद्रा म्हणाला, ‘खेळामध्ये सीमा ओलांडण्याची क्षमता आहे. पण, मला विश्वास आहे की, पुढील काही महिने प्रत्येकाचे लक्ष्य जीवनात स्थैर्य आणण्यावर केंद्रित झालेले असेल. खेळ मनोधैर्य उंचावण्यासाठी व लोकांना पुढे वाटचाल करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.’ या महामारीमुळे जगभरात २६ लाखांपेक्षा अधिक व्यक्ती संक्रमित आहेत. त्यात आतापर्यंत १.८५ लाख व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यामुळे जगभरात सर्व क्रीडास्पर्धा ठप्प झाल्या आहेत किंवा रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यात टोकियो आॅलिम्पिकचाही समावेश आहे. (वृत्तसंस्था)
CoronaVirus: कोरोनामुळे खेळाचे अर्थकारण सर्वाधिक प्रभावित होईल : बिंद्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 3:32 AM