टोकियो : ‘जर येत्या दोन महिन्यामध्ये आगामी टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले, तर कोरोना विषाणूचे विविध प्रकारांमध्ये संक्रमण होऊ शकते,’ असा धोक्याचा इशारा जपानच्या एका वैद्यकीय संस्थेचे प्रतिनिधित्व करणारे डॉ. नाओतो उएयामा यांनी दिला.जपान डॉक्टर्स युनियनचे अध्यक्ष उएयामा यांनी सांगितले की,‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) आणि जपान सरकार २०० हून अधिक देशातील आणि प्रदेशातील सुमारे १५ हजार ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळाडूंसह हजारो अधिकारी, परीक्षक, प्रसारमाध्यमे आणि प्रसारणकर्त्यांना देशात घेऊन येणार आहे. कोरोना महामारीदरम्यान हा एक मोठा धोका असून, याकडे कमी महत्त्व देण्यात आले आहे. कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन जगभरातील इतके लोक एकाच ठिकाणी येणे कमी धोक्याचे नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत काय होईल, हे आताच सांगणे कठीण आहे.’
- टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन सुरक्षित आणि निर्विघ्न पार पाडण्यासाठी आम्ही सर्व प्रायोजक आणि हितचिंतकांच्या संपर्कात आहोत. कोरोनामुक्त आयोजनासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत असून जगाला नवा संदेश देण्यात यशस्वी होऊ, असा दावा जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव कात्सुनोबू काटो यांनी केला. आम्ही सर्व प्रकारची खबरदारी घेत आयोजन यशस्वी करून दाखवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
- युरोपियन महासंघातील पदाधिकाऱ्यांनी जपानमधील ऑलिम्पिक आयोजनास गुरुवारी पाठिंबा दिला. युरोपियन आयोगाचे अध्यक्ष उर्सुला वान डेर आणि युरोपियन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांच्याशी ऑलिम्पिकबाबत चर्चा केली. आयोजनास ६० ते ७० टक्के नागरिकांचा विरोध असला तरी कोरोनाला हरविण्यासाठी ऑलिम्पिक आयोजनाकडे एकतेचे प्रतीक म्हणूनच पाहायला हवे, असे आवाहन मिशेल यांनी केले आहे.
‘माझ्या मते ही एक गंभीर समस्या असून यासाठी सज्ज राहावे लागेल. जर ऑलिम्पिकमुळे विषाणूचा नवीन प्रकार समोर आला, तर काय करावे लागेल याचाही विचार करणे आवश्यक आहे ’-डॉ. नाओतो उएयामा