- अयाझ मेमन, कन्सल्टिंग एडिटर लोकमतकोविड-१९ मुळे क्रीडा जगत अक्षरश: ठप्प झाले आहे. गेल्या आठवड्यात रद्द किंवा झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांची एक यादी मी तयार करीत आहे. जसे की, मेलबर्न ग्रॅण्ड पिक्स, प्रीमियर फुटबॉल लीग, अजूनही त्यात वाढ होत आहे.फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धादेखील मेच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या अठवड्यात होते; मात्र आता ही स्पर्धा सप्टेंबर आणि आॅक्टोबरमध्ये होणार आहे. इंग्लिश काऊंटी सिझन १२ एप्रिल ऐवजी २८ मे रोजी सुरू होईल.द इंडियन प्रीमियर लीग २९ मार्चला सुरू होणार होती. आता ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्यानंतर याबाबत अजून कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही. मात्र, कोविड-१९ चा प्रभाव फारसा कमी झालेला नसल्याने आयपीएलला एप्रिलमध्ये सुरुवात होईल का, यावर शंका आहे.आयपीएल ही एप्रिल-मेमध्ये होईल किंवा बीसीसीआय ही स्पर्धा अजून पुढे ढकलेल. पण, स्पर्धेचे पूर्ण सत्र होणे हे अर्धे सत्र होण्यापेक्षा किंवा स्पर्धाच रद्द होण्यापेक्षा नक्कीच चांगले आहे..सर्वांत मोठे संकट आहे ते, टोकियो आॅलिम्पिक २०२० वर. ही स्पर्धा २४ जुलैपासून सुरू होणार आहे. आॅलिम्पिक दर चार वर्षांनी होते; पण यंदा नशिबात काय आहे कुणास ठाऊक? गेल्या अठवड्यापर्यंत स्पर्धेचे वेळापत्रक बदलण्याबाबत कोणतीही सूचना नव्हती. जपान सरकार, पंतप्रधान शिंझे आबे आणि थॉमस बाक यांनी निश्चित केले की, आॅलिम्पिक ठरलेल्या वेळेलाच होईल. आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी सांगितल्याप्रमाणे आॅलिम्पिक रद्द करणे हा मुद्दा नाहीच.आॅलिम्पिक हा अनेक आघाड्यांवरील मुद्दा आहे. त्यासाठी २० ते २५ बिलियन डॉलर्स लागणार आहे. त्यासाठी जपानने मूळबजेटच ७.३ बिलियन डॉलर्सचे ठेवले होते. श्रीमंत असलेल्या जपानसाठीदेखील आर्थिकदृष्ट्या हा मोठा फटका असेल.आॅलिम्पिक पुढे ढकलले तर त्याचा परिणाम अॅथलेटिक्सवर सर्वांत जास्त होईल. हे खेळाडू वर्षानुवर्षे मेहनत घेतात. आॅलिम्पिक ‘सुवर्ण’ विजेत्या मायकेल जॉन्सन याने याबाबत टिष्ट्वटदेखील केले आहे. ‘आयओसीने आॅलिम्पिकबाबत खेळाडूंना संदेश द्यावा. खेळाडूंसमोर मोठे संकट आहे. त्यांच्याशी योग्य संवाद साधला जावा.’ पण, या विषाणूचा प्रादुर्भाव किती काळ राहील, हे अनिश्चित आहे. ही स्पर्धा रद्द होईल का, किंवा त्याबाबत आताच बोलणे योग्य होणार नाही.’
Coronavirus : कोविड-१९ मुळे ऑलिम्पिकवर संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 2:03 AM