चेन्नई : कोरोना विषाणूच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर विदेशातील विमानसेवा स्थगित करण्याच्या निर्णयानंतर बुद्धिबळाच्या जागितक संचालन संस्थेने (फिडे) रशिया येथील येकटेरिनबर्ग शहरामध्ये सुरू असलेली कँडिडेट स्पर्धा गुरुवारी मध्यावरच थांबविली. जागतिक बुध्दिबळमधील ही प्रतिष्ठेची स्पर्धा सात फेऱ्यांनंतर थांबविण्यात आली. या स्पर्धेतील आठव्या फेरीच्या लढती गरुवारी खेळल्या जाणार होत्या.‘फिडे’ अध्यक्ष अर्काडी डिवोरकोविच यांनी सांगितले की, ‘रशियन सरकारने कोरोना विषाणूच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर २७ मार्चपासूनच अन्य देशांची विमानसेवा बंद करण्याचा गंभीर निर्णय घेतला आहे. शिवाय त्यासाठी त्यांनी कुठला निर्धारित कालावधीही दिलेला नाही. त्यामुळे खेळाडूंची सुरक्षा व सुरक्षित स्वगृही परतण्याच्या हमीविना फिडेला स्पर्धा सुरू ठेवता येत नव्हती. या परिस्थितीमध्ये कँडिडेट स्पर्धा नियमातील परिच्छेद १.५ च्या आधारावर फिडे अध्यक्षांनी स्पर्धा रोखण्याचा निर्णय घेतला.’कॅँडिडेट स्पर्धेत जगभरातील आठ खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेतील विजेता खेळाडू विश्व चॅम्पियनशिपमध्ये विद्यमान विश्व चॅम्पियन नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनविरुद्ध खेळेल. फिडेने स्पष्ट केले की, यानंतर ही स्पर्धा पुन्हा आठव्या फेरीपासून प्रारभ होईल. कोविड-१९ महामारीबाबत जागतिक पातळीवरील स्थिती सुधारल्यानंतर लवकरच नवी तारिख जाहीर करण्यात येईल.आतापर्यंत या स्पर्धेतील सात फेऱ्यांमध्ये फ्रान्सचा मॅक्सिम वाचियर लाग्रेव्ह व रशियाचा इयान नेपोमिनयाची समान ४.५ गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. कोविड-१९ महामारीमुळे प्रवासवरील निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर जर्मनीमध्ये विश्वनाथन आनंद एका वेबसाईटसाठी स्पर्धेचे आॅनलाईन समालोचन करीत होता. (वृत्तसंस्था)
CoronaVirus : फिडे कँडिडेट बुद्धिबळ स्पर्धा रोखली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 12:35 AM