नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीतील पाच ‘साई’ स्टेडियमची जबाबदारी उचलावी, असे आवाहन केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी कॉर्पोरेट जगताला केले आहे. कॉर्पोरेट जगताना पुढाकारे घेऊन देशातील युवा पिढीची गुणवत्ता शोधण्याची वेळ आली आहे, असेही राठोड यांनी सांगितले.राठोड यांनी पुढे म्हटले, की ‘प्रत्येक ठिकाणी आम्हाला बदल पाहिजे आहे. युवा आणि ऊर्जात्मक भारताचे निर्माण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्देश आहे. यासाठी मी कॉर्पोरेट जगताला आवाहन करतो, की त्यांनी राजधानीमधील पाच स्टेडियम सांभळण्याची जबाबदारी घ्यावी.’ त्याचप्रमाणे, ‘भारत एक निद्रिस्त वाघ आहे.आज शंभर करोडहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशातून केवळ ५ हजार खेळाडू सहभागी होत आहेत आणि मर्यादित पदक जिंकत आहेत. परंतु, एक दिवस जग आपल्या क्षमतेला नक्की ताकद मानेल,’ असेही राठोड यांनी म्हटले. दरम्यान, दिल्लीतील एका कार्यक्रमामध्ये राठोड क्वीन्स बॅटन रिलेमध्ये धावले आणि अशी कामगिरी करणारे ते देशाचे पहिले क्रीडामंत्री ठरले. (वृत्तसंस्था)
कॉर्पोरेट जगताने ‘साई’ स्टेडियम्सची जबाबदारी घ्यावी, क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 12:48 AM