पुणे : राज्यस्तरीय हॅन्डबॉल खेळामध्ये सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी क्रीडा संचालनालयात सुरु असलेल्या लाचेची साखळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने समोर आणली असून याप्रकरणी विभागीय उपसंचालकाला गुरुवारी अटक करण्यात आली आहे. अनिल मारुतराव चोरमल (वय ५४) असे या उपसंचालकाचे नाव आहे. विविध शासकीय नोकरी, पोलीस भरती तसेच उच्च शिक्षणासाठी खेळाडुंना काही जागा राखीव असतात. अशा जागांवर आपली वर्णी लागावी, यासाठी क्रीडा संचालनालयात प्रमाणपत्र मिळवून देणारी साखळी आहे. विविध संघटनांचे पदाधिकारी क्रीडा संचालनालयातील अधिकाºयांना हाताशी धरुन अशी प्रमाणपत्रे दिली जातात. याप्रकरणी एका खेळाडुकडे महाराष्ट्र हँडबॉल संघटना व पुणे जिल्हा हँडबॉल संघटनेचे पदाधिकारी रुपेश उत्तम मोरे व राजेश विठ्ठल गारडे यांनी २५ हजार रुपयांची मागणी केली होती. लाचेच्या मागणीबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आली होती. त्याच्या पडताळणीत या दोघांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत विभागीय उपसंचालकाचा लाच मागणीमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने अनिल मारुतराव चोरमल यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी मागितलेले पैसे हे उपसंचालकांसाठीच मागितले असल्याचे पुरावे चौकशीत पुढे आल्याने ही कारवाई करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक सीमा मेंहदळे करीत आहेत. तक्रारदार यांनी २०१७ मध्ये राज्यस्तरीय हँडबॉल खेळामध्ये सहभाग घेतला होता. त्यांना पोलीस दलात भरती होण्यासाठी त्यांनी खेळाडू प्रवर्गातून अर्ज केला होता. त्यासाठी त्यांच्याकडे असलेले राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र क्रीडा व युवा सेवा संचालनालय येथील उपसंचालकांकडून पडताळणी करुन हवे होते़ त्यासाठी राजेश गारडे व रुपेश मोरे यांनी तक्रारदाराला ३५ ते ४० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले होते. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी करत असताना २१ सप्टेंबर रोजी तडजोडीमध्ये २५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. मात्र, प्रत्यक्ष लाच स्वीकारली गेली नव्हती. असे असले तरी लाचेची मागणी केली होती. त्यामुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हडपसर येथे लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली होती़.
क्रीडा संचालनालयातील भ्रष्ट साखळीचा भांडाफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 10:16 PM