- शिवाजी गोरेपुणे : इंटरनॅशनल स्कूल स्पोर्ट्स फेडरेशनच्या (आयएसएफ) माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित विविध शालेय स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याच्या नावाखाली आर्थिक मलिदा उकळण्याचा क्रीडा खात्याचा डाव नव्या परिपत्रकामुळे उघडकीस आला आहे.या अंतर्गत होणाऱ्या फुटबॉल, अॅथलेटिक्स व जलतरण स्पर्धांत राज्यातील विविध शाळांच्या संघांनी व वैयक्तिक स्पर्धेत खेळाडूने प्रत्येकी अडीच लाख रुपये भरून खेळावे, असे पत्रकात नमूद आहे. हे पत्रक राज्याच्या क्रीडा विभागातर्फे विविध जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे हे क्रीडा खात्यातील वरिष्ठांपासून क्रीडाधिकाºयांपर्यंत सर्वांनी स्पर्धांच्या नावाखाली लाखो रुपये उकळण्याचा प्रकार असल्याची कुजबूज सुरू झाली आहे. काही उपसंचालक व क्रीडाधिकारी संबंधित शाळांकडून पैैसे गोळा करण्यासाठी आघाडीवर असल्याचे समजते. ही कुजबूज सुरू झाल्यानंतर, राज्याचे क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल यांनी शालेय संघ व खेळाडूंना या स्पर्धेसाठी पाठवू नका, असे परिपत्रक संबंधितांना पाठविले आहे. यामुळे गेल्या तीन वर्षांपासून होत असलेल्या या भ्रष्टाचाराला आळा बसेल, अशी चिन्हे आहेत.स्पर्धेत सहभागासाठी एजंट!स्पर्धेमध्ये विविध शाळांच्या संघांनी सहभागी व्हावे यासाठी राज्यातील काही उपसंचालकांनी चक्क एजंटही नेमल्याचे क्रीडा संघटकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले. हे एजंट श्रीमंतांची मुले असलेल्या शाळेत जाऊन शिक्षकांना क्रीडा खात्याचा धाक दाखवून किंवा आर्थिक प्रलोभन दाखवून खेळाडूंच्या सहभागासाठी प्रवृत्त करतात, अशी माहिती मिळाली.
आयएसएफ स्कूल गेम्सच्या नावाखाली भ्रष्टाचार! क्रीडा खाते उकळते मलिदा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 1:54 AM