ऑनलाइन लोकमतरिओ, दि. १९ : भारतीय मल्ल नरसिंग यादव कटाचा बळी ठरला असल्याचा पुरावा क्रीडा लवादापुढे सादर करण्यास आम्हाला अपयश आले. त्यामुळे निर्णय आमच्या विरोधात गेला आणि नरसिंगला रिओ आॅलिम्पिकला मुकावे लागण्यासोबतच चारवर्षांच्या बंदीच्या शिक्षेला सामोरे जावे लागले, अशी कबुली भारतीय कुस्ती महासंघाने दिली.
डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग म्हणाले की, नरसिंग जर कटाचा बळी ठरला असेल तर गुन्हेगार कोण आणि त्याला अद्याप शिक्षा का झाली नाही, याची माहिती क्रीडा लवादाला हवी होती. बृजभूषण पुढे म्हणाले, मला जेवढे कळले त्यानुसार क्रीडा लवादाने विचारणा केली की भारतीय कायद्यानुसार अद्याप दोषींना शिक्षा का झाली नाही. दोषींना केवळ अटक करण्यावर ते समाधानी नव्हते. दोषींना कुठल्या प्रकारची शिक्षा झाली आहे का, हे जाणून घेण्यास क्रीडा लवाद उत्सुक होते. जर दोषी तुरुंगात असते तर निर्णय आमच्या बाजूने लागला असता.
त्यांनी पुढे सांगितले की, कुठला कट झाल्याचा पुरावा आम्हाला क्रीडा लवादापुढे सादर करता आला नाही. आम्ही प्रयत्न केले, पण निर्णय आमच्या विरोधात गेला. क्रीडा लवादाने समितीला विचारणा केली की, एफआयआरवर कुठली कारवाई का करण्यात आली नाही. भारतीय न्यायव्यवस्थेनुसार कायदेशीर प्रक्रिया असून चौकशी अद्याप पूर्ण झाली नसल्याचे आम्ही त्यांनासांगितले, पण आतापर्यंत प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी होती, असे त्यांचे मत होते. नरसिंग आणि भारतासाठी हा दुर्दैवी निर्णय ठरला. आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणारा पहिला खेळाडू असलेल्या नरसिंगला कटाचा बळी ठरल्यामुळेबंदीच्या शिक्षेला सामोरे जावे लागले.
बृजभूषण पुढे म्हणाले, आम्ही या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करीत आहोत. देशात एक गट विरोधात काम करीत आहे. नरसिंगविरुद्ध कट रचला गेला असून भारत सरकारतर्फे या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला हवी. त्यामुळेभविष्यात कुणा खेळाडूविरुद्ध असा कट रचला जाणार नाही. दोषींची नावे उघड करायला हवी. नरसिंगच्या स्थितीबाबत बोलताना बृजभूषण म्हणाले, तो काही बोलण्याच्या स्थितीत नाही. तो केवळ रडत असून आम्ही त्याच्या टीमला त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.
भारतीय पथक प्रमुख राकेश गुप्ता म्हणाले, नरसिंगला शनिवारी क्रीडाग्राम सोडावे लागेल. भारतात पोहोचल्यानंतर वकिलाच्या सल्ल्याने अपील करण्याबाबत निर्णय घेऊ. सध्या वेळ नसल्यामुळे या प्रकरणात वकिलाचा सल्लाही घेता आलानाही. १३ आॅगस्ट रोजी वाडाने नोटीस बजावली. आम्हाला १५ आॅगस्ट रोजी नोटीस मिळाला. आमचे वकील भारतातून येथे येऊ शकत नव्हते आणि आम्हीही त्यांच्यासोबत चर्चा करू शकत नव्हतो. वाडाने बजावले होते की, तुम्ही या नाहीतर आम्ही निर्णय घेऊ. आमच्या वकिलांनी भारतातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपली बाजू माडंली. भारतातून नाडाचा कुठला वकील उपस्थित राहू शकत नव्हता.
नाडाच्या एका अधिकाऱ्याला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. अधिकारी आला होता, पण तो पूर्ण तयारीने नव्हता. त्याने जास्त युक्तिवाद केला नाही. जर नाडाकडून कुणी तयारीनिशी आले असते तर त्याचे मत विचारात घेण्यात आले असते. वाडाचे वकील पूर्ण तयारीनिशी आलेहोते.