बंगळुरू : देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेला ‘राजीव गांधी खेलरत्न’ यंदादेखील वादाच्या भोवऱ्यात अडकला. पॅरालिम्पियन एच. एन. गिरीशा याच्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयाने टेनिस स्टार सानिया मिर्झा हिला यंदा मिळणाऱ्या या पुरस्काराला बुधवारी स्थगिती दिली.गेल्या वर्षी पुरस्कार निवड समितीने या पुरस्कारासाठी कुणालाही योग्य मानले नव्हते. यंदा अखेरच्या क्षणी विश्व दुहेरी टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सानियाच्या नावाची शिफारस करण्यात आली. केंद्रीय क्रीडा मंत्रालयानेदेखील तिच्या नावावर मोहोर उमटवली. सानियाला राष्ट्रीय क्रीडादिनी २९ आॅगस्ट रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित सोहळ्यात या पुरस्काराने गौरविण्यात येणार होते; पण आता कर्नाटक हायकोर्टाच्या स्थगितीमुळे पुरस्कार वादात अडकला. २०१२च्या लंडन पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत गिरीशाने रौप्यपदक जिंकल्यानंतर २०१४च्या इंचियोन एशियाडमध्येही कांस्य जिंकले. त्याने कोर्टात याचिका दाखल करून या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी आपल्याला डावलण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सानियाला सन्मानित करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देऊन त्याने परिस्थितीत गांभीर्य आणले. राष्ट्रपती भवनात २९ आॅगस्ट रोजी आयोजित सोहळ्याला आता केवळ ३ दिवस उरले असून, सानिया हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी अमेरिकेतून नवी दिल्लीत दाखल होत असल्याची चर्चा होती; पण प्रकरण कायदेशीर वादात अडकले. कोर्टाने बुधवारी गिरीशाची याचिका स्वीकारली; शिवाय मंत्रालयाला निर्णयाचा फेरआढावा घेण्यास सांगितले. दुसरीकडे, सानिया या पुरस्कारापासून वंचित राहिल्यास दुहेरीतील नंंबर वन खेळाडू आणि विम्बल्डन चॅम्पियन असलेल्या या खेळाडूसोबत हे निराशादायी ठरेल. (वृत्तसंस्था) मी या पुरस्काराचा खरा हक्कदार आहे. मंत्रालयाने गुणपद्धती लक्षात घेतल्यास ९० गुणांसह मी सर्वांत आघाडीवर आहे. सानिया माझ्या गुणांच्या जवळपासही नाही. सानियाने दुहेरीत ग्रँडस्लॅम जिंकले हे खरे आहे; पण २०११पासून आॅलिम्पिक, पॅरालिम्पिक, एशियाड, राष्ट्रकुल स्पर्धा आणि विश्व चॅम्पियनशिप यांमधील कामगिरी ‘खेलरत्न’साठी विचारात घेतली जाते, हेदेखील सत्य आहे.- एच. एन. गिरीशा,पॅराअॅथलिट.
सानियाच्या ‘खेलरत्न’ला न्यायालयाची स्थगिती
By admin | Published: August 27, 2015 3:34 AM