जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 46 लाख 46,707 इतकी झाली आहे. त्यापैकी 87 लाख 37,835 रुग्ण बरे झाले असले तरी 6 लाख 08,978 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 11 लाख 19,307 इतका झाला असून 27,514 जणांचं निधन झालं आहे. 7 लाख रुग्ण बरेही झाले आहेत. कोरोनामुळे क्रीडा स्पर्धा रद्द झाल्यामुळे खेळाडूंनाही त्याचा फटका बसला आहे.
भारताच्या अॅथलिट्सवरही उपसामारीची वेळ आली आहे. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी कुणी सराव करणं सोडून दिलंय, तर रिक्षा चालवणाऱ्या वडिलांसाठी कुणी ब्रेक घेतलाय. परिस्थिती सुधरली नाही, तर पुढील आयुष्य हे हातगाडीवर केळी व फळं विकावी लागतील, अशी काहींना भीती वाटत आहे.
कोरोनामुळे क्रीडा स्पर्धाच होत नसल्यानं गरीब घरातील खेळाडूंना स्वतःचा सराव कायम राखण्यात आणि त्याचा खर्च उचलण्यात अडचण येत आहे. इंडियन एक्स्प्रेसनं दिल्लीतील खेळाडूंच्या घटत्या संख्येबाबत प्रशिक्षक पुरषोत्तम यांच्याशी चर्चा केली आणि अशा खेळाडूंची व्यथा मांडली. 2017च्या आशियाई युवा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मेराज अली ( 19 वर्ष) याच्यासह ते अनेकांना प्रशिक्षण देतात. अलीच्या कुटुंबात सहा सदस्य आहेत. त्यात लहान बहिणी, मोठा भाऊ आणि आई-वडील असे सदस्य आहेत. पूर्वी दिल्लीतील श्रिलोकपूरी येथे अली भाड्याच्या घरात राहतो. 1500 मीटर शर्यतीतील धावपटूला दैनंदिन गरज पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
तो म्हणाला,''मागील डिसेंबर महिन्यात माझ्या वडिलांची किडनी काढण्यात आली. त्यांना आता आरामाची गरज आहे, परंतु त्यांना कुटुंबाचं पोट भरण्यासाठी काम करावं लागत आहे. परिस्थिती न सुधारल्यास मलाही त्यांच्यासोबत काम करावं लागेल आणि खेळाडू बनण्याचं स्वप्न विसरावं लागेल. दूधही आम्हाला आता महाग वाटत आहे आणि त्यामुळे आम्ही चहा पिणंही सोडलं आहे.'' मिराजचा भाऊ टॅक्सी चालवायचा, परंतु त्याची नोकरी गेली.
चेन्नईतील उंच उडीपटू थाबिथा फिलिप महेश्वरन यानं 2019च्या आशियाई युथ अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्णपदक जिंकले होते. त्याला कुटुंबाला मदत करण्यासाठी ब्रेक घ्याला लागला आहे. ''लॉकडाऊनमध्ये आम्हाला सर्वाधिक फटका बसला. NGO मला सपोर्ट करतात, परंतु त्यांनीही निधीत कपात करण्यास सुरुवात करत आहेत. माझे वडील रिक्षा चावलतात आणि कुटुंबाचा आर्थिक गाढा त्यांच्याच खांद्यावर आहे. पण, लॉकडाऊनमुळे तेही घरीच आहेत आणि त्यामुळे आम्हाला दोन वेळचं जेवणंही खाता येत नाही,''असे महेश्वरन यानं सांगितलं.