भारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांनी शनिवारी कोरोना व्हायरसवर मात केली आणि त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पण, अजूनही ते ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. ९१ वर्षीय मिल्खा सिंग यांनी प्रकृती सुधारली होती आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विनंतीनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आले. त्यांची ८२ वर्षीय पत्नी निर्मल कौर यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत.
''कुटुंबीयांच्या विनंतीनंतर मिल्खा सिंग यांना हॉस्टिपलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती स्थीर आहे. ते अजूनही ऑक्सिजन व न्यूट्रीशनच्या सपोर्टवर आहेत. त्यांच्या पत्नीला मात्र ICUत दाखल करण्यात आले आहे,''असे फोर्टीज हॉस्पिटलनं सांगितले. मिल्खा सिंग यांनी कोरोनावर मात केल्याचे हॉस्पिटलने आधीच सांगितले होते.
सोमवारी मिल्खा सिंग यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. बुधवारी त्यांच्या पत्नीलाही कोरोना झाल्याचे समोर आले आणि त्यांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. मिल्खा सिंग यांचा मुलगा व गोल्फपटू जीव शनिवारी दुबईहून चंडिगढ येथे दाखल झाला. त्यांची मुलगी मोना मिल्खा सिंग या अमेरिकेत डॉक्टर आहेत आणि काही दिवसांपूर्वी त्याची भारतात दाखल झाल्या.
मिल्खा सिंग यांनी आशियाई स्पर्धेत चार सुवर्णपदकं जिंकली आहेत आणि १९५८च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही त्यांच्या नावावर सुवर्णपदक आहेत. १९६०च्या रोम ऑलिम्पिक स्पर्धेत ते ४०० मीटर शर्यतीच्या फायनलमध्ये चौथ्या स्थानावर आले होते आणि त्यांची ती कामगिरी सर्वांच्या लक्षात राहिली. त्यांनी त्या स्पर्धेत नोंदवलेला राष्ट्रीय विक्रम ३८ वर्ष अबाधित होता. १९९८मध्ये परमजीत सिंग यानं तो विक्रम मोडला. १९५६ व १९६४च्या ऑलिम्पिक स्पर्धेतही त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केलं. १९५९मध्ये त्यांना पद्म श्री पुरस्कारानं सन्मानित केले गेले.