नवी दिल्ली : देशातील खेळाडूंप्रति सकारात्मक वातावरण तयार करणे आणि रिओ आॅलिम्पिकसाठी खेळाडूंना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. खेळाचा विचार करताना जय-पराजय यापेक्षा खिलाडूवृत्तीमुळे भारताने जगात आपली ओळख निर्माण करावी, असेही पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी क्रीडामंत्री म्हणून सर्वानंद सोनोवाल यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली. आकाशवाणीवर प्रसारित ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले, ‘आॅलिम्पिक स्पर्धा सुरू होते त्या वेळी आम्ही सुवर्णपदकांच्या शर्यतीत किती पिछाडीवर आहोत, याची चर्चा करतो. रौप्य मिळाले की नाही, कांस्यपदकावर समाधान मानायचे का, याचेही चर्वितचर्वण होत असते.’क्रीडा विभागात आपल्यापुढे अनेक आव्हाने आहेत, याची कबुली देताना पंतप्रधानांनी देशात खेळाचे वातावरण तयार होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मोदी म्हणाले,‘रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या आपल्या सर्व खेळाडूंसाठी उत्साहाचे वातावरण तयार करायला हवे. प्रत्येक बाबीसाठी जय-पराजय हा निकष न लावता खिलाडूवृत्तीने भारताने जगात आपले स्थान निर्माण करायला हवे. खेळासोबत जुळलेल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतात खेळाचे वातावरण तयार करण्याचे मी देशातील नागरिकांना आवाहन करतो.’(वृत्तसंस्था)
खेळाडूंसाठी सकारात्मक वातावरण तयार करावे
By admin | Published: May 23, 2016 1:17 AM