- अयाझ मेमन(संपादकीय सल्लागार)आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या आठवड्यात खूप चांगली प्रगती झाली आहे. सर्वप्रथम महिला आशिया चषक अंतिम सामन्यात बांगलादेशने भारताला धक्का दिला. अनेकांना धक्का बसेल की मी याकडे प्रगती म्हणून का बघतोय. आजपर्यंत कधीही भारतीय महिलांनी आशिया चषक गमावलेला नाही. पण यावेळी एक अनपेक्षित निकाल लागला. बांगलादेशने केवळ अंतिम फेरी नाही, तर साखळी फेरीतही भारताला नमविल्याने हा विजय योगायोग नव्हता. महिला क्रिकेटचा प्रसार करायचा असेल, तर इतर संघांनाही चांगली कामगिरी करावी लागेल. यामुळे खेळाची उत्सुकताची वाढेल. आशियाचा विचार केल्यास भारताव्यतिरिक्त श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान यांनाही चांगली कामगिरी करणे जरुरी आहे. यामुळेच मला हा चांगला निकाल वाटतो. त्याचबरोबर भारतालाही एक धोक्याची सूचना मिळाली आहे. शिवाय बांगलादेशला एका माजी भारतीय क्रिकेटपटू अंजू जैनने मार्गदर्शन केले आहे आणि याक्जा सर्वाधिक फायदा बांगलादेशला झाला.दुसरे म्हणजे, स्कॉटलंडन नंबर वन एकदिवसीय संघ असलेल्या इंग्लंडला नमविले. स्कॉटलंडने ६ धावांनी बाजी मारली, असली तरी विजय हा विजय असतो. यामुळे आयसीसीला आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करावा लागेल. त्यांनी निर्णय घेतला की, २०१९ च्या विश्वचषकापासून केवळ १० संघच खेळतील. २०१५ मध्ये १४ संघ होते. या कमी करण्यात आलेल्या संघामध्ये स्कॉटलंडचा समावेश असून त्यांनी या धकामेदार विजयासह स्वत:ची क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे आयसीसीला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करावा लागेल.१४ जूनपासून जागतिक फुटबॉलचा थरार सुरु होईल. जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणून फुटबॉलची ओळख आहे. अनेक संघ सर्वोत्तम खेळ करत या स्पर्धेत आले असल्याने अत्यंत चुरशीचा खेळ यावेळी अनुभवायला मिळेल. अव्वल क्रमांकावरील जर्मनी , त्यानंतर ब्राझील, सर्वांना धक्का देत तिसऱ्या स्थानावर आलेले बेल्जियम, अर्जेंटिना यासारखे बलाढ्य देश एकमेकांविरुद्ध भिडणार असल्याने स्पर्धा अत्यंत अटीतटीची व रोमांचक होईल यात शंका नाही. याआधीच्या विश्वचषक स्पर्धेत जर्मनीने सहज बाजी मारली होती. पण मी विश्वचषक स्पर्धेविषयी जास्त चर्चा करणार नाही. त्याऊलट भारतीय फुटबॉलमध्ये काय घडत आहे यावर जास्त लक्ष देईन. नुकताच मुंबईत इंटरकॉन्टिनेंटल कप स्पर्धा खेळविण्यात आली. भारताने अंतिम सामन्यात केनियाला २-० असे नमवून जेतेपद पटकावले खरे, पण याआधी जे काही झाले ते लक्ष वेधणारे ठरले.पहिला सामना भारताने चायनिज तैपईविरुद्ध ५-० असा जिंकला. पण प्रेक्षक तुरळक होते. यानंतर कर्णधार सुनील छेत्रीने सोशल मिडियावर एका व्हिडिओद्वारे भारतीयांना स्टेडियमवर येण्यास भावनिक आवाहन केले. यानंतर भारताच्या सर्वच सामन्यांना तुफान प्रतिसाद मिळाला. या सर्व सामन्यांमध्ये भारतीयांचा उत्साह कमालीचा होता. यावरुन भारतामध्ये फुटबॉलची क्रेझ मोठी आहे हे कळाले, आता ती क्रेझ कशी काबीज करायचे हे मुख्य आव्हान आहे. यासाठी आॅल इंडिया फुटबॉल फेडरेशनला अधिक मार्केटिंग करावे लागेल. तसेच, विश्वचषक खेळायचे असेल, तर आपल्याला ब्राझील, जर्मनी यांच्या स्तराचा खेळ खेळावा लागेल. यासाठी कदाचित आणखी १५-२० वर्ष लागतील पण याला पर्याय नाही. त्याचबरोबर आशियाई खेळांमध्ये भारतीय फुटबॉल संघ सहभागी होणार नसल्याचे चर्चा होती. पण प्रशिक्षक व कर्णधारासह इतर खेळाडूंची मागणी आहे की आशियाई स्पर्धा खेळू द्या. कारण इथे कडवी स्पर्धा असून येथून खूप काही शिकता येईल. जर खेळाडूंना अधिक संधी मिळाली नाही, तर भारतीय फुटबॉलची प्रगती मर्यादितच राहिल.
क्रिकेट, फुटबॉलने आठवडा गाजवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 1:53 AM