आयपीएल २०२१ च्या (IPL २०२१) उर्वरित दुसऱ्या टप्प्याची सुरूवात रविवारपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) करण्यात आली. आता आयपीएलच्या सामन्यांदरम्यान ठराविक प्रमाणात प्रेक्षकांनाही स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात आला आहे. भारतात खेळवण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात एकूण २९ सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. आता उर्वरित ३१ सामने दुबईमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. संपूर्ण जग आयपीएलच्या सामन्यांचा आनंद घेत असताना मात्र अफगाणिस्तानमधील नागरिकांना आयपीएलच्या सामन्यांचा आनंद घेता येणार नाही. अफगाणिस्तानात आयपीएलच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घालण्यात आली आहे.
अफगाणिस्तानात आयपीएलच्या सामन्यांवर बंदी घालण्यामागचं कारण त्या ठिकाणी लागू करण्यात आलेला कायदा असल्याचं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार यात इस्लामला मान्य नसलेली दृष्य असल्याचं सांगत अफगाणिस्तानमध्ये आयपीएल २०२१ च्या थेट प्रक्षेपणावर बंदी घालण्यात आली आहे. मॅचच्या दरम्यान चिअरलीडर्सचा डान्स आणि स्टेडिअममध्ये महिलांच्या उपस्थिचीचं कारण देत अफगाणिस्तानातील तालिबान सरकारनं यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.