पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा भारताला पदक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या पीआर श्रीजेश याचा हॉकी इंडियानं खास सन्मान केला आहे. दिग्गज गोलकीपर पीआर श्रीजेश याची १६ क्रमांकाची जर्सी रिटायर करण्यात आल्याची घोषणा हॉकी इंडियाने केली आहे. याचा अर्थ आता भारतीय हॉकी संघातील अन्य कोणत्याही खेळाडूला या क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरता येणार नाही.
पीआर श्रीजेश याचा खास सन्मान
१६ क्रमांकाची जर्सी रिटायर
हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोला नाथ सिंह यांनी जर्सी रिटायर करण्यात आल्याची माहिती दिली. याशिवाय त्यांनी पीआर श्रीजेश नव्या रुपात हॉकी इंडियासोबत कनेक्ट राहणार असल्याची घोषणाही केली. ते म्हणाले की, श्रीजेश आता ज्युनिअर टीमच्या प्रशिक्षकाच्या रुपात काम करेल. १६ क्रमांकाची जर्सी ही सिनिअर स्तरावर रिडायर करण्यात आली आहे. पण श्रीजेश सारखा प्रतिभावंत खेळाडू शोधण्यासाठी ज्युनिअर स्तरावरील खेळाडूला ही जर्सी घालता येईल, हे देखील त्यांनी स्पष्ट केले.
सचिन-धोनीच्या क्लबमध्ये सामील झाला श्रीजेश
क्रीडा जगतात महान खेळाडूच्या सन्मानार्थ जर्सी रिटायर्ड करण्याची ही काही महिली वेळ नाही. याआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २०१७ मध्ये सचिन तेंडुलकरची १० क्रमांकाची जर्सी रिटायर करण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय भारतीय संघाला आयसीसीच्या तीन स्पर्धा जिंकून देण्याचा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीचाही असाच सन्मान करण्यात आला होता. २०१९ मध्ये क्रिकेटला अलविदा केल्यानंतर २०२३ मध्ये धोनीचा जर्सी क्रमांक ७ रिटायर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
३३० +सामने ४ ऑलिम्पिकमध्ये २ वेळचा चॅम्पियन
पीआर श्रीजेश याने आपल्या कारकिर्दीत ३३० पेक्षा अधिक सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. ४ ऑलिम्पिक स्पर्धेत तो भारतीय संघाचा भाग राहिला. यातील दोन ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाने कांस्य पदकाची कमाई केली. पॅरिस ऑलिम्पिक आधी टोकियोत पार पडललेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतही भारताच्या विजयात या पठ्ठानेच कमालीची कामगिरी करून दाखवत संघाला पदक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता.