Neeraj Chopra Gold Medal : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं पुन्हा एकदा मोठ्या व्यासपीठावर सोनेरी कामगिरी करत तिरंग्याची शान वाढवली. नीरजनं जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ मध्ये सुवर्ण पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. भारतीय शिलेदाराच्या या सोनेरी यशाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी देखील भारताची शान वाढवणाऱ्या या पठ्ठ्याला सलाम ठोकला. आजी माजी खेळाडूंनी नीरज चोप्राचं अभिनंदन केलं असून अवघं क्रिकेट विश्व 'नीरज'मय झाल्याचं दिसतं.
भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं खास चारोळ्या लिहित नीरज चोप्राच्या कामगिरीचं कौतुक केलं. "नीरज चोप्राचं अभिनंदन... आणखी एक मोठी कामगिरी, हा अविस्मरणीय क्षण आहे", असं सेहवागनं म्हटलं. तर, युझवेंद्र चहलनं फोटो शेअर करत म्हटले की, भारताचा गौरव करत आहेस, जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन नीरज चोप्रा भाई.
हार्दिक पांड्या, वीरेंद्र सेहवाग, युझवेंद्र चहल यांच्याशिवाय कुलदीप यादव आणि मयंक अग्रवाल यांनी देखील नीरजच्या सोनेरी कामगिरीचं तोंडभरून कौतुक केलं. सुवर्ण पदक जिंकणं ही आता सवय झाली असल्याचं कुलदीप यादवनं म्हटलं.
नीरज चोप्राचा सोनेरी पंच -
- ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक
- डायमंड लीगमध्ये सुवर्ण पदक
- आशियाई स्पर्धेत पदक
- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक
- जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक
दरम्यान, जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ च्या भालाफेक स्पर्धेत १२ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज अव्वल राहिला. त्यानं ८८.१७ मीटर भाला फेकून सुवर्ण पदकाला गवसणी घातली. पाकिस्तानचा अर्शद नदीम दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याला ८७.८२ मीटर अंतरापर्यंत भाला फेकण्यात यश आलं. त्यामुळं पाकिस्तानच्या अर्शदला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.