Cristiano Ronaldo, FIFA World Cup 2022: कतारमध्ये सुरू असलेल्या FIFA World Cup 2022 मधील तिसरा उपांत्यपूर्व सामना शनिवारी खेळला गेला. या सामन्यात ख्रिस्टियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल आणि मोरोक्को हे संघ आमनेसामने होते. या सामन्यात मोरोक्कोने धक्कादायकरित्या रोनाल्डोच्या पोर्तुगालचा पराभव केला. अतिशय रोमांचक अशाप्रकारे झालेल्या सामन्यात मोरोक्कोने १-० असा शानदार विजय मिळवला. या विजयासह मोरोक्कोने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता त्यांचा सामना चौथ्या उपांत्यपूर्व फेरीतील विजेत्या फ्रान्सशी होणार आहे. फ्रान्सने उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडचा २-१ असा पराभव केला. रोनाल्डोचा हा शेवटचा वर्ल्ड कप असल्याचे बोलले जात असल्याने त्याचे, पोर्तुगालला विश्वविजेता संघ बनवण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले. या पराभवानंतर रोनाल्डोने भावनिक ट्विट करत चाहत्यांना खास विनंती केली.
"पोर्तुगालने आधीच एक विश्वचषक जिंकलेला आहे- तो म्हणजे चाहत्यांचा वर्ल्डकप! आमच्या जन्मभूमीपासून आतापर्यंत कतारमध्ये अनेक पोर्तुगीज लोकांकडून आम्हाला मिळालेला पाठिंबा आणि आपुलकी अविश्वसनीय आहे. चांगल्या आणि वाईट काळात आमचे समर्थन करणे, आम्हाला पाठिंबा दणे सुरू ठेवा. आम्ही तुम्हाला आनंदी करण्यासाठी विजयांसह परतफेड करण्यासाठी सर्वकाही प्रयत्न करू!" असे भावनिक ट्विट रोनाल्डोने केले.
पोर्तुगाल संघ मैदानात उतरला होता, पण रोनाल्डोशिवाय...
सामन्यात पोर्तुगालचा संघ स्टार खेळाडू रोनाल्डोशिवाय मैदानात उतरला. सलग दुसऱ्या सामन्यात रोनाल्डोला सुरुवातीच्या-11 मध्ये स्थान देण्यात आले नाही. रोनाल्डोला ५२व्या मिनिटाला मैदानात बोलावण्यात आले. रुबेन नेव्हसच्या जागी तो बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला, पण त्याला विशेष कामगिरी दाखवता आली नाही. सामन्यात उतरल्याने रोनाल्डोने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने सर्वाधिक १९६ आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. आता या विक्रमाच्या बाबतीत रोनाल्डो कुवेतच्या बादर अल मुतावाच्या बरोबरीने आला आहे.
असा रंगला सामना-
सामन्यात सुरुवातीपासूनच पोर्तुगाल आणि मोरोक्को यांच्यात चुरशीची स्पर्धा होती. चेंडूवर ताबा मिळवणे असो की गोलसाठी प्रयत्न असोत, प्रत्येक बाबतीत दोन्ही संघ एकमेकांवर वर्चस्व गाजवताना दिसत होते. पण सामन्यातील पहिला गोल युसूफ एन नेसरीने ४२व्या मिनिटाला केला. त्यानंतर सामना संपेपर्यंत एकाही संघाला गोल करता आला नाही, त्यामुळे या गोलच्या जोरावर मोरोक्कोने सामना जिंकला आणि विश्वचषकात इतिहास रचला. फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात उपांत्य फेरी गाठणारा हा पहिला आफ्रिकन संघ ठरला. यापूर्वी कॅमेरूनने १९९० मध्ये, सेनेगलने २००२ मध्ये आणि घानाने २०१० मध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली होती, मात्र यापैकी एकाही संघाला पुढे प्रगती करता आली नाही. तर पोर्तुगाल संघ केवळ दोनदा (१९६६, २००६) अव्वल-4 मध्ये पोहोचला होता. तिसऱ्यांदा तशी कामगिरी करणे त्यांना शक्य झाले नाही.