कतारमध्ये सुरू असलेल्या फीफा वर्ल्डकप-२०२२ स्पर्धेत पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा जलवा पाहायला मिळत आहे. पोर्तुगाल संघानं राऊंड-१६ मध्ये आपली जागा पक्की केली आहे आणि वर्ल्डकप जिंकून इतिहास रचण्यासाठी संघ तयार आहे. यातच ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या फ्रँचायझी फूटबॉलसाठीही चर्चेचा विषय ठरत आहे. कारण त्याला एक अशी डील मिळाली आहे की जी फूटबॉलच्या इतिहासातली आजवरची सर्वात मोठी डील ठरणारी आहे.
रिपोर्टनुसार, ३७ वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डोला सौदी अरेबियाच्या एका क्लबनं ऐतिहासिक ऑफर देऊ केली आहे. सौदीच्या क्लब Al Nassr ने ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी प्रत्येक सीझनसाठी २०० मिलियन युरो देण्याची तयारी दाखवली आहे. ही ऑफर २०२३ ते २०२५ पर्यंतसाठी आहे. म्हणजेच ३ वर्षाचे ६०० मिलियन युरो दिले जातील. ही संपूर्ण डील भारतीय चलनानुसार जवळपास ४ हजार कोटी रुपये इतकी होते.
सौदी अरेबियाच्या क्लबमध्ये सामील होणार रोनाल्डो?रोनाल्डोनं नुकतंच मेनचेस्टर युनायटेडला रामराम केला आहे. त्यामुळे रोनाल्डो आता कोणत्याही क्लबशी बांधील राहिलेला नाही. त्यामुळेच रोनाल्डो सौदीची ऑफर स्वीकारू शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती रोनाल्डोकडून देण्यात आलेली नाही. मेनचेस्टर युनायटेड संघात रोनाल्डोला दरवर्षी जवळपास २६ मिलियन युरो मिळत होते. तर सौदी अरेबियाच्या क्लबनं यापेक्षा पाच पटीनं अधिक मानधन देण्याची तयारी दाखवली आहे. स्थानिक रिपोर्ट्च्या दाव्यानुसार रोनाल्डोचं संपूर्ण लक्ष सध्या फक्त वर्ल्डकपवरच आहे. त्यानंतरच तो पुढील निर्णय घेणार आहे.
Al Nassr सौदीचा स्थानिक क्लबयुरोप आणि लॅटीन अमेरिकेसारखंच सौदी अरेबिया देखील एक फूटबॉल लीग आयोजित करतं. जी बऱ्यापैकी लोकप्रिय देखील आहे. सौदी प्रोफेशनल लीगमध्ये जगभरातील अनेक स्टार खेळाडू मोठ्या मानधनासह खेळतात. याच लीगमध्ये आपल्या संघाकडून खेळण्यासाठी Al Nassr क्लबनं रोनाल्डोला ऐतिहासिक ऑफर दिली आहे. या क्लबनं आतापर्यंत अनेकदा ही स्पर्धा जिंकली देखील आहे.
ख्रिस्तियानो सारखं मोठं नाव आपल्या क्लबशी जोडलं जावं असा Al Nasser क्लबचा प्रयत्न आहे. तसंच २०३० साली सौदी अरेबियामध्ये वर्ल्डकपचं आयोजन केलं जाणार आहे. त्यावरही देशाचं लक्ष आहे. रोनाल्डोनं ऑफर स्विकारली तर संपूर्ण जगाचं या क्लबकडे लक्ष जाईल.
फिफा वर्ल्डकपमध्ये पोर्तुगालची दमदार कामगिरीपोर्तुगालच्या संघानं यंदाच्या वर्ल्डकपमध्ये राऊंड-१६ मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. संघाचं सध्या क्वार्टरफायनलवर लक्ष लागून राहिलं आहे. पोर्तुगालचे दोन सामने झाले आहेत आणि दोन्ही सामन्यांमध्ये विजयाची नोंद केली आहे. पोर्तुगालनं घाना संघाला ३-२ ने पराभूत केलं. तर उरुग्वेवर २-० अशी दणदणीत मात केली. पोर्तुगालचा पुढचा सामना कोरियाशी होणार आहे.