सिडनी : लेग स्पिनर या नात्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून हा प्रवास अनेक चढ-उतारांनी गाजला. पाच वर्षांआधी तळाच्या स्थानाला फलंदाजी करीत असताना इतक्या मोठ्या स्थानावर झेप घेईल, असा विचार मनातही डोकावला नसल्याची प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने गुरुवारी व्यक्त केली.आयसीसीकडून एकाचवेळी सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि कसोटी क्रिकेटपटू, असा दुहेरी सन्मान मिळविणारा २६ वर्षांचा स्मिथ सर्वांत कमी वयाचा खेळाडू बनला आहे. त्याने सप्टेंबर २०१४ ते सप्टेंबर २०१५ या काळात २५ डावांत १७३४ धावा काढल्या. सचिन तेंडुलकरपाठोपाठ अशी कामगिरी करणारा तो सर्वांत कमी वयाचा खेळाडू आहे. तो म्हणाला,‘अशा पुरस्कारांच्या सन्मानाबद्दल विचारही करू शकत नाही. मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करीत, संघाला अधिकाधिक विजय मिळवून देण्यासाठी आपण झटत असतो. अविश्वसनीय कामगिरीच्या बळावर सर्वोत्कृष्ट खेळाडू बनणे सुखद आहे. ’ स्टीव्हने अलीकडे फलंदाजीत शानदार कामगिरी केली; पण पाच वर्षांआधी २०१० मध्ये पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर त्याला लेग स्पिनरच्या रूपात पदार्पणाच्या कसोटीत खेळविण्यात आले होते. तळाच्या स्थानावर त्याला फलंदाजीही करावी लागली. (वृत्तसंस्था)तो म्हणतो,‘ पाच वर्षांआधी खेळणे सुरू केले तेव्हा अशा लौकिकास्पद सन्मानापर्यंत पोहोचेन असे स्वप्नातही वाटले नव्हते. गेल्या पाच वर्षांतील प्रवास सोपा नाही.’ स्मिथ हा सर गारफिल्ड सोबर्स करंडक जिंकणारा आॅस्ट्रेलियाचा चौथा खेळाडू आहे. याआधी रिकी पाँटिंग २००६ आणि २००७, मिशेल जॉन्सन २००९ आणि २०१४ तसेच मायकेल क्लार्क २०१३ यांना हा सन्मान मिळाला आहे. (वृत्तसंस्था)
‘सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू’चा प्रवास खडतर : स्मिथ
By admin | Published: December 24, 2015 11:46 PM