दोहा : सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल स्वीकारून पिछाडीवर पडलेल्या गतउपविजेत्या क्रोएशियाने जबरदस्त पुनरागमन करत कॅनडाचा ४-१ असा शानदार पराभव केला. सलग दुसऱ्या पराभवानंतर कॅनडाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये अंड्रेज क्रेमेरिचने दोन गोल करत क्रोएशियाच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल करत अल्फोन्सो डेव्हिसने कॅनडाला धमाकेदार सुरुवात करून दिली. अल्फोन्सो विश्वचषक स्पर्धा इतिहासात गोल करणारा पहिला कॅनेडियन ठरला. क्रेमेरिचने ३६ व्या मिनिटाला गोल क्रोएशियाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. यानंतर ४४व्या मिनिटाला मार्को लिवाजाने गोल करीत क्रोएशियाला मध्यंतराला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात पुन्हा एकदा क्रेमेरिचने ७०व्या मिनिटाला, तर लोवरो मायरने अतिरिक्त वेळेत गोल करीत क्रोएशियाचा विजय निश्चित केला.
विश्वचषक सामन्यात दोन गोल करणारा अँड्रेज क्रेमेरिच हा मारिओ मांजुकिचनंतरचा क्रोएशियाचा दुसरा खेळाडू ठरला.
कॅनडाच्या अल्फोन्सो डेव्हिसने दुसऱ्याच मिनिटाला गोल करत २०१८ नंतरचा विश्वचषक स्पर्धेतील सर्वात वेगवान गोल नोंदवला.
मार्को लिवाजाने क्रोएशियाकडून खेळताना सलग तिसऱ्या सामन्यात गोल केला.