मेलबोर्न : फेडरर व नदाल यांच्यादरम्यान अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या प्रतिस्पर्ध्याला पुन्हा एकदा उजाळा मिळणार आहे. निमित्त आहे आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत आज, रविवारी रंगणाऱ्या अंतिम लढतीचे. लाल मातीचा बादशहा मानल्या जाणारा राफेल नदाल आणि टेनिसचा शहेनशाह रॉजर फेडरर यांच्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या या लढतीच्यानिमित्ताने चाहत्यांना संस्मरणीय टेनिस अनुभवाला मिळणार आहे. जेतेपदाची लढत या उभय दिग्गज खेळाडूंदरम्यान खेळली जाईल, असा विचारही कुणी केला नव्हता, पण अव्वल मानांकित अँडी मरे व नोव्हाक जोकोविच यांचे आव्हान लवकरच संपुष्टात आल्यामुळे हे स्वप्न साकार झाले. उभय खेळाडूंदरम्यान एकूण ३५ वी आणि ग्रँडस्लॅम स्पर्धेतील नववी लढत राहील. त्यात ३५ वर्षीय फेडरर एकेरीतील आपले १८ वे विजेतेपद व नदाल १५ वे जेतेपद पटकावण्यास प्रयत्नशील असतील. निर्णायक सेटपर्यंत रंगलेल्या उपांत्य लढतीत ग्रिगोर दिमित्रोव्हचा पराभव केल्यानंतर नदालने म्हटले, की ग्रँडस्लॅम फायनलमध्ये रॉजर फेडररसोबत खेळणे विशेष आहे. मी खोटे बोलू शकत नाही.फेडररने पाच सेटपर्यंत रंगलेल्या उपांत्य लढतीत मायदेशातील सहकारी स्टॅनिस्लास वावरिंकाचा पराभव केला. नदालने फेडररविरुद्ध २३ सामने जिंकले आहेत, तर ११ सामन्यांत त्याला पराभव स्वीकारावा लागला आहे. ग्रँडस्लॅम फायनलमध्ये त्याची कामगिरी ६-२ अशी व आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये ३-० अशी आहे. नदाल म्हणाला, ‘‘आकडेवारी भूतकाळ असून याचा रविवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीवर परिणाम होणार नाही.’’ स्पेनच्या या दिग्गज खेळाडूला फेडररच्या तुलनेत अधिक विश्रांतीची संधी मिळाली नाही. कारण शुक्रवारी तो पाच सेटची लढत खेळला. दरम्यान, २००९ मध्ये नदालने फर्नांडो वर्डास्कोचा पाच सेटपर्यंत रंगलेल्या उपांत्य लढतीत पराभव केल्यानंतर दोन दिवसांनी फेडररचा पाच सेट््सच्या फायनलमध्ये पराभव केला होता. उभय खेळाडू इतिहास नोंदवण्याच्या उंबरठ्यावर आहे. फेडरर (३५ वर्षे, १७४ दिवस) ओपन युगात ग्रँडस्लॅम चॅम्पियन ठरलेल्या आॅस्ट्रेलियाच्या केन रोसवालनंतर दुसरा प्रौढ खेळाडू ठरू शकतो. (वृत्तसंस्था)
‘ड्रीम फायनल’ची चाहत्यांना उत्सुकता
By admin | Published: January 29, 2017 4:50 AM