गोल्ड कोस्ट - क्रीडाविश्वात मानाचं स्थान असलेली राष्ट्रकुल स्पर्धा यंदा ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट येथे सुरु आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धचा आजचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, या शेवटच्या दिवसाचे सर्व सामने संपत आले असून भारताचेही आव्हान संपुष्टात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करणारे भारताचे अनेक शिलेदार या स्पर्धेत जोमाने उतरले आणि पदकांची लयलूट केली. बॉक्सिंग, नेमबाजी, भालाफेक, कुस्ती आणि टेबल टेनिस यासारख्या खेळांत भारताने पदकांची 'सिल्व्हर ज्युबिली' पार केली. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत आतापर्यंत 26 सुवर्ण, 20 रौप्य व 20 कांस्य पदकांची कमाई केली. एकूण 66 पदकासह ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडनंतर भारत पदतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. 2014 मध्ये ग्लास्गो कॉमनवेल्थमध्ये भारताने 64 पदके जिंकली होती. त्या तुलनेत भारताची कामगीरी चांगली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या कॉमनवेल्थमध्ये भारताने 101 पदके जिंकली होती. 2002 मध्ये मॅनचेस्टरमध्ये 69 पदके जिंकली होती.
- दहाव्या दिवशी भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत केला इतिहासराष्ट्रकुल स्पर्धेच्या दहाव्या दिवशी एक इतिहास केला. 10व्या दिवशी भारताने तब्बल 17 पदके जिंकली. राष्ट्रकुलच्या इतिहासात भारताने आधी कधीही एकाच दिवसात इतकी पदके जिंकली नव्हती. 2010मध्ये एकाच दिवशी 15 पदके जिंकली होती. टेबल टेनिस एकेरी व भालाफेकीत प्रथमच सुवर्ण मिळाले. भारताने बॉक्सिंगमध्ये 6, कुस्तीत4, टेबल टेनिसमध्ये 3आणि बॅडमिंटन, स्क्वॅश, भालाफेक, नेमबाजीत 1-1 पदक पटकावले.
नेमबाजी - भारतीय नेमबाजांनी ही राष्ट्रकुल स्पर्धा चांगलीच गाजवली. नेमबाजीमध्ये भारताने सात सुवर्ण पदकांसह एकून 16 पदकांची कमाई केली. अनीश भानवाला, मेहुली घोष और मनु भाकर यासारख्या युवा नेमबाजांसह हीना सिद्धू, जीतू राय आणि तेजस्विनी सावंत या अनुभवी खेळाडूंनी भारतासाठी पदके जिंकली.
वेटलिफ्टिंग - वेटलिफ्टिंगमध्ये भारताने एकूण नऊ पदके जिंकली. यामध्ये पाच सुवर्णपदाकांसह प्रत्येकी दोन रोप्य आणि कांस्य पदकांचा समावेश आहे. मीराबाई चानू, संजीता चानू आणि पूनम यादव यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.
रेसलिंग (कुस्ती) - भारताच्या कुस्तीपटू यामध्ये निराश केलं नाही. या क्रीडा प्रकारात भारताने पाच सुवर्णपदकांसह एकून 12 पदकांवर नाव कोरलं. यामध्ये बजरंग पूनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि सुमित यासाठी कुस्तीपटूंचा समावेश आहे.
बॅडमिंटन - बॅडमिंटनमध्ये भारताने सहा पदाकांची कमाई केली. मिश्र प्रकारात भारताच्या संघाने सुवर्ण पदकावर नाव कोरलं. महिला एकरीमध्ये सायनाने आज सकाळी झालेल्या सामन्यात सिंधूचा पराभव करत सुवर्ण कामगिरी केली. सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे पुरुष एकेरीमध्ये किदम्बी श्रीकांताला परभवाला सामोर जावं लागले. किदम्बीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
टेबल टेनिस - या क्रीडा प्रकारात भारतीय महिला आणि पुरुष संगाने सुवर्ण पदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. याशिवाय महिला एकेरीमध्ये मणिका बत्राने 'गोल्डन स्मॅश' लगावला. त्याचप्रमाणे पुरुष आणि महिला संघाने मिश्र टेबल टेनिस प्रकारात रौप्य पदक जिंकले.
बॉक्सिंग - भारतीय बॉक्सरने 9 पदकांची कमाई केली. यामध्ये तीन सुवर्ण पदाकांचा समावेश आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच देशाचं प्रतिनिधित्व करणारी विश्वविजेती बॉक्सर मेरी कोम हिनं 'सोनेरी' ठोसा लगावला. त्यानंतर, पुरुषांच्या ५२ किलो वजनी गटात गौरव सोळंकीनंही सोनेरी यश मिळवलं.
अॅथलेटिक्स - अॅथलेटिक्समध्ये भारताने तीन पदकांची कमाई केली. नीरज चोपडाने सुवर्ण पदकाची कमाई केली. तर सीमा पूनियाने रौप्य आणि नवदीपने कांस्य पदकावर नाव कोरलं.
हॉकी - भारतीय हॉकी संघासाठी ही स्पर्धा एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे गेली. पुरुष आणि महिला संघाला एकही पदक जिंकता आलं नाही. रिकाम्या हाताने त्यांना मायदेशी परतावे लागले.