Commonwealth Games 2022 Divya Kakran Mohit Grewal wins Bronze: भारताच्या कुस्तीपटूंनी शुक्रवारी पदकांची अक्षरश: बरसात केली. आधी अंशू मलिकने रौप्यपदक पटकावले. त्यानंतर बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि दीपक पुनिया या तिघांनी सुवर्णपदकाची कमाई केली. त्यानंतर कांस्यपदका साठी झालेल्या सामन्यांमध्ये १२५ किलो वजनी गटात भारताच्या मोहित ग्रेवालने विजय मिळवला. त्याने आरोन जॉन्सनला पराभवाचं पाणी पाजलं. तर दुसरीकडे भारताची दिव्या काकरा हिनेही कांस्यपदकाची कमाई केली. तिने ६८ किलो वजनी गटात टोंगा देशाच्या टायगर लिली कॉकर लिमाली हिला चितपट करत सामना खिशात घातला.
--
भारतीय कुस्तीपटूंची 'गोल्डन हॅटट्रिक'!
भारतीय कुस्तीपटू दीपक पुनिया (Deepak Punia) याने भारताला यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील नववे आणि दिवसातील तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले. बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक या दोघांच्या विजेतेपदानंतर दीपक पुनियानेही सुवर्णकमाई केली. दीपक पुनियाने ८६ किलो वजनी गटात पाकिस्तानच्या मुहम्मद इनाम याला ३-० असं पराभूत केले. भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिक (Sakshi Malik) हिने ६२ किलो वजनी गटात कॅनडाच्या गोडीनेज गोन्झालेझ हिला चितपट करत पराभूत करत गोल्ड मेडल मिळवलं. तर त्याआधी बजरंग पुनिया (Bajrang Punia) याने भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं. कुस्तीच्या ६५ किलो वजनी गटात बजरंग पुनियाने कॅनडाच्या लाचलन मॅकनील याचा ९-२ असा अतिशय सहज आणि एकतर्फी पराभव केला. अंशू मलिक (Anshu Malik) हिला सुवर्णपदक पटकावता आलं नाही. पण तिने भारताला रौप्यपदकाची कमाई करून दिली.