मुंबई : मुंबई जिल्हा क्रीडा अधिकारी आणि मुंबई जिल्हा हौशी सायकलिंग संघटना आयोजित सायकलिंग स्पर्धेत पुरुषांच्या खुल्या गटात सोनू गुप्ताने आपले वर्चस्व राखताना अवघ्या आठवडाभराच्या कालावधीत दुसऱ्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तर शालेय स्पर्धेत १४ वर्ष मुलांच्या गटात प्रजीन नाडर, १७ वर्ष गटात शुभम म्हात्रे आणि १९ वर्ष मुलांच्या गटात वेद केरकर अव्वल स्थानी राहिले.
वांद्रे कुर्ला संकुलातील सेबी भवनजवळ रंगलेल्या या शर्यतीतील पुरुषांच्या ३० किलोमीटर अंतराच्या शर्यतीत सोनूला दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या चिन्मय केवलरामानीने चांगले आव्हान दिले होते. पण सोनुने शर्यतीच्या शेवटच्या टप्प्यात मुसंडी मारत विजेतेपद निश्चित केले. या गटात काही सेकंदाच्या फरकाने मागे राहिलेल्या अभिषेक वाघेलला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
शालेय स्पर्धामध्येही चांगली चुरस पहायला मिळाली. १९ वर्षाखालील गट वेद केरकरने सिद्धार्थ दवंडेला मागे टाकत पहिले स्थान मिळवले. रोहन बुधारानी तिसऱ्या स्थानी राहिला. अन्य शर्यतीमध्ये १७ वर्ष गटात शुभम म्हात्रे पहिला, हर्षवर्धन पेंटा दुसऱ्या आणि आरव गुहागरकर तिसऱ्या क्रमांकावर राहिला. १४ वर्ष मुलामध्ये प्रजीन नाडरने पहिले स्थान पटकावले. या गटात शार्दूल म्हात्रे दुसऱ्या आणि ओंकार बालढाई तिसरा आला.