कोलकाता : ईडन गार्डनवर शनिवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याआधी बिग बी अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत गाऊन शानदार सुरुवात केली. मात्र, जेव्हा अमिताभ यांनी या कार्यक्रमासाठी चार करोड रुपयांचे मानधन घेतल्याचे वृत्त समोर आले, तेव्हा सोशल मीडियावर अमिताभ यांच्यावर मोठी टीका झाली. विशेष म्हणजे ही बाब माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या लक्षात आल्यानंतर त्याने लगेच याबाबत खुलासा करताना अमिताभ यांनी या कार्यक्रमासाठी एकही रुपया न घेता उलट आपल्या खिशातून ३० लाख रुपये खर्च केले असल्याचे सांगत हा वाद मिटवला.पाकिस्तानविरुद्धच्या शानदार विजयानंतर सोशल मीडियावर टीम इंडियाचा कौतुक सोहळा सुरू असतानाच अमिताभ यांच्यावर होत असलेल्या टीकेने सर्वांचेच लक्ष वेधले. सामन्याआधी राष्ट्रगीत गाण्यासाठी तब्बल चार कोटी रुपये घेतल्याचे कळताच नेटिझन्सनी ‘बिग बी’वर हल्ला चढवला. जेव्हा ही बाब क्रिकेट असोसिएशन आॅफ बंगालचा (कॅब) अध्यक्ष सौरव गांगुलीला कळाली, तेव्हा त्याने सर्व वाद शांत केला. या प्रकरणी गांगुलीने सांगितले की, ‘भारत- पाकिस्तान सामन्यासाठी केवळ प्रवास खर्चाविषयी अमिताभ यांच्याशी चर्चा झाली होती. मात्र, तो खर्चही घेण्यास त्यांनी नकार देताना, मी केवळ कोलकाता आणि देशावरील प्रेमासाठी येत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी त्यांनी स्वत: ३० लाख रुपये खर्च केले आहेत.’ गांगुलीच्या या खुलाशानंतर अमिताभ बच्चन यांच्यावर सोशल मीडियावर सुरू असलेली चर्चा थांबली.
‘बिग बी’साठी धावून आला ‘दादा’
By admin | Published: March 21, 2016 2:25 AM