मुंबई : दादर - खोपोली अशा ७४ किमी अंतराच्या खुल्या सायकल शर्यत स्पर्धेला दादर येथून २५ सप्टेंबरला सुरुवात होईल. मुंबई शहर हौशी सायकलिंग संघटनेच्या वतीने होणारी ही शर्यत खुली आणि माऊंटनरिंग बायकिंग (एमटीबी) अशा दोन गटांत विभागण्यात आली असून, २३ सप्टेंबरपर्यंत स्पर्धेच्या प्रवेशिका स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.रविवारी, दादर पोलीस स्टेशनपासून सुरू होणाऱ्या या शर्यतीचा मार्ग भवानी शंकर रोड - गोल मंदिर, वीर कोतवाल उद्यान, माहेश्वरी उद्यान, प्रियदर्शनी जंक्शन, अण्णा भाऊ साठे उड्डाणपूल, मैत्रीपार्क, छत्रपती शिवाजी महाराज चौक, देवनार टेलिफोन फॅक्टरी, सानपाडा, जुईनगर, कोकण भवन, खारघर, कळंबोली जंक्शन, पनवेल शहर उड्डाणपूल, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४, खोपोली असा असणार आहे. तसेच, दादर ते देवनार टेलिफोन फॅक्टरी हा या शर्यतीचा न्युट्रल झोन असेल. एकूण ६४ हजार रुपयांची रोख पारितोषिके असलेल्या या शर्यतीच्या अधिक माहिती आणि प्रवेशिकेसाठी १६७, गाळा १, इस्लामिया मशीद गल्ली, भवानी शंकर मार्ग, दादर येथे संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
दादर - खोपोली सायकल शर्यत २५ सप्टेंबरला
By admin | Published: September 20, 2016 4:09 AM