ऑनलाइन लोकमत
धरमशाला, दि. २ - पहिल्या टी-२० सामन्यामध्ये द. आफ्रिकेने भारतावर ७ गड्यानी विजय मिळवत गांधी-मंडेला मालिकेची विजयाने सुरुवात केली. जेपी ड्युमिनीच्या नाबाद ६८ (३४) आणि एबी डिव्हिलियर्स ५१ धावांच्या बळावर २०० धावांचे अवघड लक्ष लिलया पार केले. अक्षर पटेलच्या १६व्या षटकात ड्युमिनीने सलग ३ षटकार लगावत २३ धावा वसूल करुन सामन्याचे चित्र पालटले. त्यापुर्वी,
द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात रोहित शर्माच्या शानदार शतकी खेळीमुळे भारताने द. आफ्रिकेला २०० धावांचे आव्हान दिले. भारताने या सामन्यात २० षटकात १९९ धावा केल्या आहेत.
द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी पहिल्या तीन षटकात चांगली खेऴी केली. मात्र चौथ्या षटकात शिखर धवन अवघ्या तीन धावांवर धावबाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने दमदार खेळी करत भारताच्या धावसंख्येत वाढ करण्यास मोलाची कामगिरी केली. विराट कोहली ४३ धावांवर झेलबाद झाला. त्याला गोलंदाज काईल ऍबॉटने झेलबाद केले. त्यापाठोपाठ लगेचच रोहित शर्माही झेलबाद झाला. रोहित शर्माने ६६ चेंडूत १२ चौकार आणि पाच षटकार लगावत १०६ धावा केल्या. सुरेश रैना १४ धावांवर पायचीत झाला तर अंबाती रायडू शून्य धावेवर धावबाद झाला. महेंद्रसिंग धोनीने नाबाद २० धावा केल्या, तर अक्षर पटेलने दोन धावा केल्या. द. आफ्रिकेकडून गोलंदाज काईल ऍबॉटने दोन आणि ख्रिस मॉरिसमे एक बळी टिपला.
या सामन्यात श्रीनाथ अरविंदने पदार्पण केले असून अजिंक्य रहाणे, हरभजनसिंग, स्टअर्ट बिन्नी व अमित मिश्राला विश्रांती देण्यात आली आहे.