लंडन : १४ वा मानांकित पोलंडचा हुबर्ट हरकाज याने मंगळवारी दुसरा मानांकित दानिल मेदवेदेवचा पाच सेटमध्ये पराभव करीत प्रथमच विम्बल्डन टेनिसची उपांत्यपूर्व फेरी गाठली. दरम्यान, काल अनुभवी रॉजर फेडरर यानेदेखील उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.
हरकाज-मेदवेदेव हा सामना सोमवारी पावसामुळे चौथ्या सेटमध्ये थांबविण्यात आला. हरकाजने आज चौथा आणि पाचवा सेट जिंकून सामना २-६,७-६,३-६,६-३,६-३ ने संपविला. आज बुधवारी हरकाजला रॉजर फेडररविरुद्ध लढत द्यावी लागेल.
विम्बल्डनची प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या अन्य पुरुष खेळाडूंमध्ये कॅनडाचा डेनिस शापोवालोव, इटलीचा मॅटियो बेरेटिनी, हंगेरीचा मार्टन फुकसोविच आणि रशियाचा कारेन खाचनोव यांचा समावेश आहे. दरम्यान, महिला गटात झेक प्रजासत्ताकाची आठवी मानांकित कॅरोलिना पिलिसकोवा हिने स्वित्झर्लंडची व्हिक्टोरिया गोलुबिच हिचा ६-२,६-२ ने पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. ग्रॅन्डस्लॅमची उपांत्य फेरी गाठण्याची ही तिसरी वेळ आहे. २०१७ ला फ्रेंच ओपन आणि २०१९ ला ऑस्ट्रेलियन ओपनची उपांत्य फेरी गाठली होती.
बोपन्ना-सानिया यांची लढत स्थगितभारताची मिश्र जोडी रोहन बोपन्ना आणि सानिया मिर्झा यांचा चौथ्या फेरीतील सामना मंगळवारी पावसामुळे स्थगित झाला. सामना स्थगित करण्यात आला त्यावेळी भारतीय जोडी नेदरलँडच्या जीन ज्युलियन रॉजर आणि स्लोव्हेनियाची आंद्रेजा क्लेपॅक यांच्याडून माघारली होती.
फेडरर १८ व्यांदा उपांत्यपूर्व फेरीत२० ग्रँडस्लॅम विजेतेपदाचा राजा स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने १८ व्यांदा विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आठ वेळा विम्बल्डन जेतेपद जिंकणाऱ्या फेडररने इटलीच्या लोरेन्झो सोनेगोला ७-५, ६-४, ६-२ने पराभूत केले. १९७७ नंतर ग्रँडस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक देणारा फेडरर सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. फेडररने ब्रिटिश खेळाडू कॅमेरून नॉरीवर मात करत अंतिम-१६ मध्ये स्थान पक्के केले होते. तो कारकिर्दीत ६९ वेळा ग्रँडस्लॅमच्या चौथ्या फेरीत पोहोचला होता.