मुंबई : ग्रँडमास्टर दीप्तयान घोष याने नवव्या मुंबई महापौर खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखताना इंटरनॅशनल मास्टर श्याम निखिलला धक्का देत अव्वल स्थान काबीज केले. त्याचवेळी तीन खेळाडूंनी संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी झेप घेतली.स्पर्धेत दीप्तयानने ६.५ गुणांसह अग्रस्थान मिळवले आहे. तर रशियाचा ग्रँडमास्टर ग्रचेव बोरिस, भारताचा हिमल गुसैन व ताजिकिस्तानचा अमानतोव्ह फारुख यांनी प्रत्येकी ६ गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे.विशेष म्हणजे याआधी संयुक्तपणे अव्वल स्थानी आलेल्या दीप्तयान आणि पी. श्याम निखिल यांच्यात अटीतटीची लढत झाली. २९व्या चालीमध्ये श्यामने हत्तीच्या जोरावर दीप्तयानच्या राजाला शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र वजिराच्या साहाय्याने दीप्तयानने श्यामची चाल परतावून लावली. यानंतर दीप्तयानने आक्रमक चाली रचताना ६०व्या चालीमध्ये बाजी मारली. तसेच, रशियाच्या बोरिसने इंटरनॅशनल मास्टर अभिषेक केळकरचा, हिमलने सम्माद शेट्ये व अमानतोव्हने शैलेश द्रविडचा पाडाव करून संयुक्तपणे दुसरे स्थान मिळवले. (क्रीडा प्रतिनिधी)
दीप्तयान घोषचे अग्रस्थान कायम
By admin | Published: June 08, 2016 3:00 AM