नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसने आठ षटकारांसह केलेल्या नाबाद ८२ धावांच्या स्फोटक खेळीनंतरही दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला गुजरात लायन्सविरुद्ध रोमहर्षक लढतीत एका धावेने निसटता पराभव पत्करावा लागला.गुजरातने ६ बाद १७२ धावा केल्या होत्या. मॉरिसने अवघ्या ३२ चेंडूंतच ४ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद ८२ धावा ठोकताना दिल्लीला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले होते; परंतु अखेर एका धावेने पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीने ५ बाद १७१ धावा केल्या. या पराभवामुळे दिल्लीचा सलग ३ विजयांचा क्रम तुटला. दिल्लीचा ५ सामन्यांतील हा दुसरा पराभव आहे, तर आयपीएल नऊमधील नवीन संघ गुजरातचा सहा सामन्यांतील हा पाचवा विजय ठरला.विजयाचा पाठलाग करताना धवल कुलकर्णीच्या सुरेख गोलंदाजीसमोर दिल्लीची अवस्था १0.४ षटकांत ४ बाद ५७ अशी झाली होती; परंतु त्यानंतर खेळपट्टीवर पाय ठेवलेल्या ख्रिस मॉरिस आणि जेपी ड्युमिनी या जोडीने पाचव्या गड्यासाठी ३९ चेंडूंतच ८७ धावांची तडाखेबंद भागीदारी करताना दिल्लीच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. मॉरिसने स्मिथ, फॉल्कनर व तांबे यांचा विशेष समाचार घेतला. मॉरिसने स्मिथला ३, फॉल्कनर आणि तांबे यांना प्रत्येकी २ षटकार ठोकले.मॉरिसच्या फटकेबाजीमुळे दिल्लीला अखेरच्या षटकात विजयासाठी १४ धावांची गरज होती; परंतु ड्वेन ब्राव्होने या षटकात फक्त १२ धावा दिल्या. त्यामुळे दिल्लीला एका धावेने पराभव पत्करावा लागला. मॉरिसला साथ देणाऱ्या जेपी ड्युमिनीने ४३ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह ४८ धावा केल्या. गुजरातकडून धवल कुलकर्णी याने १९ धावांत ३ गडी बाद केले.त्याआधी, ब्रँडन मॅक्युलम आणि ड्वेन स्मिथ यांनी केलेल्या तडाखेबंद शतकी भागीदारीच्या बळावर गुजरात लायन्स संघाने ६ बाद १७२ धावा ठोकल्या. गुजरात लायन्सकडून ब्रँडन मॅक्युलमने सर्वाधिक ३६ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ६० आणि ड्वेन स्मिथने ३० चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावांची खेळी सजवली. जेम्स फॉल्कनरने २२ व दिनेश कार्तिकने १९ धावांचे योगदान दिले. दिल्लीकडून इम्रान ताहीरने ३ व मॉरिसने २ गडी बाद केले. कर्णधार झहीर खानने नाणेफेक जिंकून गुजरात लायन्सला फलंदाजीला आमंत्रित केले; परंतु त्याचा हा निर्णय गुजरात लायन्सच्या सलामीवीरांनी चुकीचा ठरवताना ६४ चेंडूंतच वादळी ११२ धावांची भागीदारी केली. (वृत्तसंस्था)>संक्षिप्त धावफलक : गुजरात लायन्स : २0 षटकांत ६ बाद १७२. (ब्रँडन मॅक्युलम ६0, ड्वेन स्मिथ ५३, फॉल्कनर २२, दिनेश कार्तिक १९, इम्रान ताहीर ३/२४, मॉरिस २/३५); दिल्ली डेअरडेव्हिल्स : २0 षटकांत ५ बाद १७५. (ख्रिस मॉरिस नाबाद ८२, ड्युमिनी ४८, धवल कुलकर्णी ३/१९).
मॉरिसच्या स्फोटानंतरही डेअरडेव्हिल्स पराभूत
By admin | Published: April 28, 2016 4:35 AM