कानपूर : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सने थरारक बाजी मारताना गुजरात लायन्सचा २ विकेट्सने पाडाव केला. भल्यामोठ्या धावांचा यशस्वी पाठलाग करताना दिल्लीने श्रेयस अय्यरच्या शानदार ९६ धावांच्या खेळीच्या जोरावर विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने ५ बाद १९५ धावांचा डोंगर उभारल्यानंतर दिल्लीने १९.४ षटकात ८ बाद १९७ धावा केल्या. दोन्ही संघांचे आयपीएलमधून आव्हान संपुष्टात आले असल्याने हा सामना केवळ एक औपचारिक ठरला.ग्रीनपार्क स्टेडियवर धावांचा पाठलाग करताना श्रेयसने एकाकी झुंज देताना ५७ चेंडूत तब्बल १५ चौकार व २ षटकात ठोकताना ९६ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात ९ धावांची गरज असताना तो बसिल थम्पीच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. यावेळी दिल्लीवर पराभवाचे संकट ओढावले होते. परंतु, अमित मिश्राने २ चेंडूवर २ चौकार मारताना गुजरातच्या हातून सामना हिसकावून घेतला. संजू सॅमसन (१०), करुण नायर (३०) आणि रिषभ पंत (४) हे फॉर्ममध्ये असलेले फलंदाज अपयशी ठरल्यानंतर श्रेयसने एकाकी झुंज देताना दिल्लीला विजयी मार्गावर आणले. तत्पुर्वी, प्रमुख फलंदाज अपयशीट ठरल्यानंतरही गुजरातने आव्हानात्मक मजल मारण्यात यश मिळवले. दिल्लीकरांनी सुरुवातीला नियंत्रित मारा करुन गुजरातला फटकेबाजीपासून दूर ठेवले. धोकादायक द्वेन स्मिथ (८) आणि कर्णधार सुरेश रैना (६) स्वस्तात बाद झाल्याने गुजरात संघ अडचणीत आला होता. परंतु, युवा फलंदाज इशान किशनने एक बाजू सांभाळताना शानदार फलंदाजी केली. त्याने २५ चेंडूत ५ चौकार व एका षटकारासह केलेल्या ३४ धावांच्या जोरावर गुजरातने दमदार धावसंख्येच्या दिशेने कूच केली होती.अनुभवी अमित मिश्राने किशनला बाद करुन गुजरातला मोठा धक्का दिला. मात्र यानंतर दिनेश कार्तिक - अॅरोन फिंच यांनी ९२ धावांची वेगवान भागीदारी केली. कार्तिक २८ चेंडूत ४० धावांची खेळी करुन परतला, तर फिंचने ३९ चेंडूत ६ चौकार व ४ षटकारांसह ६९ धावांचा तडाखा देत गुजरातला आव्हानात्मक मजल मारुन दिली. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक :गुजरात लायन्स : २० षटकात ५ बाद १९५ धावा (अॅरोन फिंच ६९, दिनेश कार्तिक ४०; अमित मिश्रा १/२७) पराभूत वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स : १९.४ षटकात ८ बाद १९७ धावा (श्रेयस अय्यर ९६, करुण नायर ३०; जेम्स फॉल्कनर २/३९)
डेअरडेव्हिल्सचा थरारक विजय
By admin | Published: May 11, 2017 12:46 AM