- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रोव्हर दत्तू भोकनळ याचा संघर्ष खूप प्रभावित करणारा आणि अत्यंत भावनिक आहे. त्याने ज्या परिस्थितीतून आॅलिम्पिकपर्यंत मजल मारली आहे, ती आश्चर्यकारक आहे,’ अशा शब्दांत भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने दत्तूचे कौतुक केले. एका नामांकित वाहिनीवर सेहवागचा उम्मीद इंडिया नावाचा कार्यक्रम येत असून या कार्यक्रमामध्ये भारतातील विविध खेळाडूंच्या तयारीवर आणि त्यांच्या परिश्रमावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या कार्यक्रमाची सोमवारी मुंबईत घोषणा करण्यात आली. सेहवाग म्हणाला, ‘या कार्यक्रमाच्यानिमित्ताने मी अनेक खेळाडूंना भेटलो. यामध्ये दत्तूचा संघर्ष अंगावर काटा आणण्यासारखा आहे. त्याला सुरुवातीला साधे पोहताही येत नसताना, आर्मीमध्ये त्याची ओळख रोइंगशी झाली. गेल्या वर्षी रिओ आॅलिम्पिकमध्ये १३ वे स्थान पटकावून त्याने अभिमानास्पद कामगिरी केली.’ त्याच वेळी सेहवागने भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्त्रीच्या तुलनेत पिछाडीवर पडल्याबाबत विचारलेल्या प्रश्नांना त्याने टाळले. सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकर व व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश असलेल्या सल्लागार समितीने मुख्य प्रशिक्षकपदासाठी ज्या उमेदवारांची मुलाखत घेतली त्यात सेहवागचा $$्निसमावेश होता. या खेळाडूंच्या तुलनेत माझा संघर्ष काहीच नाही. माझ्यासाठी प्रत्येक कोपऱ्यामध्ये क्रिकेटच्या सुविधा उपलब्ध होत्या. दिल्लीमध्ये हजारो अकादमी आहेत. त्यात तुम्हाला सुविधा मिळू शकतात. त्यांच्या तुलनेत आम्हा क्रिकेटपटूंना कुठलाही संघर्ष करावा लागत नाही.- वीरेंद्र सेहवाग