- पेस-बोपन्ना पराभूत
नवी दिल्ली : लियांडर पेस आणि रोहन बोपन्ना या अनुभवी जोडीला चेक गणराज्यविरुद्ध आर.के. खन्ना स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या डेव्हिस चषक टेनिसच्या विश्व प्ले आॅफ लढतीत पराभवाचे तोंड पाहावे लागल्याने दुसऱ्या दिवशी भारत १-२ ने माघारला. पेस-बोपन्ना यांचा सलग सेटमध्ये रॉडेक स्टेपनेक-अॅडम पाब्लासेक जोडीने दोन तास नऊ मिनिटांत ५-७, २-६, २-६ ने पराभूत केले. काल पहिल्या दिवशी युकी भांबरी पराभूत झाल्यानंतर सोमदेवने यशस्वी किल्ला लढवीत १-१ ने बरोबरी साधून दिली होती. पेस-बोपन्ना यांच्यावर बरीच भिस्त होती. पण दोघेही दिग्गज मोक्याच्या क्षणी चुका करून बसले. भारताची आशा आत रविवारी होणाऱ्या परतीच्या एकेरी लढतींवर राहील. भांबरीला विश्व क्रमवारीत ४० व्या स्थानावर असलेला जिरी वेस्ली याच्याविरुद्ध तसेच सोमदेवला लुकास रोसोलविरुद्ध खेळावे लागेल. सोमदेवने काल वेस्लीला पराभूत केल्यामुळे आज स्टेडियमवर मोठ्या संख्येने टेनिस चाहते पोहोचले होते. स्टेडियम खच्चून भरले होते आणि त्यात चेक पाठीराख्यांचाही समावेश होता. अमेरिकन ओपनचे मिश्र प्रकारात जेतेपद घेणाऱ्या पेसकडून सर्वांना बऱ्याच आशा होत्या. पेस न्यूझीलंडविरुद्ध ख्राईस्टचर्च येथे खेळू शकला नव्हता. या सामन्यात तो परतल्याने मिनेनीला बाहेर बसावे लागले. सामन्यानंतर स्वत: पेस स्तब्ध झाला. प्रेक्षक निराश होऊन परतल्याने स्टेडियम सुन्न झाले होते.पेस-बोपन्ना जोडीने पहिल्या सेटमध्ये ५-५ अशी बरोबरी साधली होती. पण त्यानंतर पेसची सर्व्हिस कमकुवत ठरल्याचा लाभ घेत प्रतिस्पर्धी जोडीने ५१ मिनिटांत ५-७ ने पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये तिसऱ्या आणि पाचव्या गेममध्ये बोपन्नाने सर्व्हिस गमावली. याचा लाभ घेत चेक जोडीने सलग आठ गेममध्ये सर्व्हिस कायम ठेवून सेट ६-२ ने जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये चार गेमपर्यंत २-२ अशी बरोबरी होती. पण पाचव्या गेममध्ये बोपन्नाने सर्व्हिस गमावताच संकट ओढवले. आठव्या गेममध्ये पाहुण्या जोडीने विजयाची औपचारिकतादेखील पूर्ण केली. सामन्यादरम्यान भारतीय जोडीत समन्वयाचा अभाव जाणवला, शिवाय त्यांचे परतीचे फटकेदेखील प्रतिस्पर्धी कोर्टमध्ये जात नव्हते. (वृत्तसंस्था)बोपन्नासोबत आॅलिम्पिक पदक जिंकू : पेस झेक प्रजासत्ताक संघाविरुद्ध डेव्हिस चषकात दुहेरीचा महत्त्वाचा सामना गमावल्यानंतर वर्षभरापूर्वी बोपन्नासोबत जमलेल्या दुहेरी जोडीबाबत शंका व्यक्त केली जात आहे. देशाचा सर्वांत अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेस हा शनिवारी पराभवानंतर काहीसा भावुक दिसला. त्याने बोपन्नासोबत रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचा चाहत्यांना शब्द दिला आहे.दुहेरी लढतीत पेस-बोपन्ना जिंकतील, असा सर्वांनाच विश्वास होता; पण योग्य समन्वयाअभावी या जोडीला पराभव पत्करावा लागला. सामन्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर पेस भावुक झाला. तो म्हणाला, ‘‘सर्बियाविरुद्धचा दुहेरीचा सामना वर्षभरापूर्वी आम्ही पाच सेटमध्ये जिंकला होता. या सामन्यातही आम्ही विजयाचे दावेदार होतो; पण प्रतिस्पर्धी जोडीने शानदार खेळ केला.’’ ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाचा मानकरी असलेला पेस पुढे म्हणाला, ‘‘रोहन हा उत्कृष्ट खेळाडू आहे. या पराभवाला मात्र मीदेखील तितकाच जबाबदार आहे. रिओ आॅलिम्पिकमध्ये आमची जोडी पदक जिंकू शकते. आम्ही पदक जिंकू आणि आपणच आमचे कौतुक कराल. आम्ही एकमेकांवर विश्वास दाखवायला हवा.’’अॅडमला लक्ष्य केली ही चूक चेकच्या अॅडम पाव्लासेकला आम्ही लक्ष्य केली ही चूक झाली. या सामन्याचे विजयी हक्कदार आम्हीच होतो. पण अॅडमने अफलातून खेळ केला. संपूर्ण सामन्यात त्याने गुण नोंदविले. मैदानावर तीन महान खेळाडू व एक युवा खेळाडू होता. युवा खेळाडूने उत्कृष्ट खेळ केला.