ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. 15 - युवा खेळाडू रामकुमार रामनाथन आणि अनुभवी साकेत मिनैनी यांनी येथे शुक्रवारी आपआपले एकेरीचे सामने जिंकताना भारताला दक्षिण कोरियाविरुद्ध डेव्हिस चषक आशिया ओशियाना झोन ग्रुप एक लढतीत २-0 अशी आघाडी मिळवून दिली.भारत आणि कोरिया यांच्यादरम्यान ग्रासकोर्टवर खेळवल्या जाणाऱ्या या लढतीच्या पहिल्या एकेरीत २१ वर्षीय रामकुमारने अपेक्षेनुसार कामगिरी करताना कोरियाच्या सियोंग चांग होंग याचा २ तास ३६ मिनिटांच्या संघर्षपूर्ण लढतीत ६-३, २-६, ६-३, ६-५ अशी मात केली. कोरियन खेळाडूने चौथ्या सेटमध्ये पायाला क्रॅम्प आल्यामुळे सामन्यातून माघार घेतली. त्याचबरोबर भारताने १-0 अशी आघाडी मिळवली.दुसऱ्या एकेरी सामन्यात साकेत मिनैनी याने कोरियन खेळाडू योंग क्यू लिम याच्याविरुद्ध ६-१, ३-६, ६-४ आघाडी घेतली. तथापि, त्यानंतर साकेतदेखील क्रॅम्प आल्यामुळे कोर्टवर आदळला. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केला आणि भारतीय संघाने हा गेम सोडण्याचा निर्णय घेतला. हा सेट ६-३ असा कोरियाने जिंकला. साकेतने दुखापतीमुळे टाईम आऊट घेतला आणि निर्णायक सेटमध्ये त्याने आपल्या शक्तिशाली सर्व्हिसचा फायदा घेताना ५-२ अशी आघाडी घेतली. या सेटमध्ये त्याचा कोरियन प्रतिस्पर्धी त्रस्त दिसला आणि लिमने २-५ अशा पिछाडीनंतर या लढतीतून माघार घेतली. अशा प्रकारे भारताने या लढतीत २-0 अशी आघाडी घेतली.शनिवारी दुहेरीत लिएंडर पेस आणि रोहन बोपन्ना या अनुभवी जोडीसमोर होंग चुंग आणि युनसियोंग चुंग यांचं आव्हान असणार आहे. भारताची जोडी ही लढत जिंकून भारताला ३-0 अशी निर्णायक आघाडी मिळवून देईल, अशी आशा बाळगली जात आहे. ही लढत जिंकल्यास भारत विश्व ग्रुप प्लेआॅफसाठी पात्र ठरणार आहे. त्याच प्रमाणे या लढतीत विजय मिळवल्यास रविवारी होणारे दोन्ही एकेरीच्या सामन्यात फक्त औपचारिकताच बाकी असेल.जागतिक २१७ व्या रँकिंगच्या रामकुमारसमोर ४२७ वे मानांकन असणारा चाँगने कडवी झुंज दिली आणि पहिला सेट गमावल्यानंतर त्याने दुसरा सेट ६-२ असा जिंकताना बरोबरी साधली; परंतु सामन्यादरम्यान मांडीच्या दुखापतीमुळे तो पिछाडीवर पडला आणि नंतर मुसंडी मारू शकला नाही. पावसाचाही ग्रासकोर्टवर परिणाम दिसला. तेथे आर्द्रतेमुळे कोर्टवर खेळणे खेळाडूंना कठीण झाले.अशीच परिस्थिती दुसऱ्या सामन्यातदेखील होती. १५0 व्या रँकिंगच्या साकेत आणि ६२६ व्या रँकिंगच्या लिम या दोघांनाही कोर्टवर समस्येला सामोरे जावे लागले; परंतु साकेतने दुखापतीनंतरही धीरोदात्त व सुरेख खेळ केला. त्यामुळे भारताला दोन्ही सामने जिंकता आले. या लढतीत दवाचाही परिणाम खेळाडूंच्या खेळावर दिसला व त्यामुळे खेळाडूंना खेळताना समस्या आली.