नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध पहिल्यांदा डे-नाईट कसोटी सामन्याचा प्रयोग करू, अशी आधी घोषणा करणाऱ्या बीसीसीआयला माघार घ्यावी लागली. दुलिप करंडकाच्या सामन्याचे निकाल पाहिल्यानंतरच डे-नाईट कसोटीचा विचार केला जाईल, अशी भूमिका बोर्डाने घेतली आहे.बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी एप्रिल महिन्यात न्यूझीलंड-भारत यांच्यात सप्टेंबर महिन्यात डे-नाईट कसोटी खेळविली जाईल, अशी घोषणा केली होती, पण कॅलेंडरनुसार सर्व सामने दिवसा खेळविले जातील. बीसीसीआयचे संयुक्त सचिव अमिताभ चौधरी म्हणाले, ‘दुलिप करंडकातील प्रयोगानंतरच डे-नाईट कसोटी खेळविण्याचा विचार केला जाऊ शकतो, अशी बीसीसीआयची भूमिका आहे. परिस्थितीचे आकलन केल्याशिवाय तसेच खेळाडूंची मते जाणून घेतल्याशिवाय डे-नाईट कसोटीचा विचार होऊ शकत नाही.’ दुलिप करंडक सामन्यात प्रथमच गुलाबी चेंडूच्या वापराने डे-नाईट सामना खेळविला जाणार आहे. नंतर कसोटीसाठी हा प्रयोग विचाराधिन असेल. न्यूझीलंडविरुद्ध डे-नाईट कसोटी खेळविण्याचा विचार गुंडाळल्यानंतर इंग्लंड किंवा आॅस्ट्रेलियाविरुद्ध असा विचार होऊ शकतो. भारताला मायदेशात यंदा १३ कसोटी सामने खेळायचे आहेत. इंग्लंड किंवा आॅस्ट्रेलियाविरुद्ध डे- नाईट कसोटी खेळविण्याबाबत चौधरी म्हणाले, ‘दुलिप करंडक सामन्यानंतरच याविषयी निर्णय घेऊ.’ न्यूझीलंड बोर्ड गुलाबी चेंडूने भारतात डे-नाईट सामना खेळण्यास उत्सुक नाही. आधी परीक्षण करण्यात यावे आणि नंतरच कसोटीचे आयोजन व्हावे अशी त्यांची भूमिका आहे.या मुद्यावर भारत- आणि न्यूझीलंड बोर्डात मुळीच मतभेद झालेले नाहीत. (वृत्तसंस्था)
न्यूझीलंडविरुद्ध डे-नाईट कसोटी व्यावहारिक नाही
By admin | Published: July 02, 2016 5:53 AM