कराची : ‘पापा, मला गोळी लागली आहे,’ १५ वर्षींय हुसेनचे हे अखेरचे शब्द होते. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत भारताविरुद्ध पाकिस्तानने विजय मिळवल्यानंतर चाहत्यांनी जल्लोष साजरा करताना गोळीबार केला होता. पाकिस्तानात विजयाचा आनंद साजरा होत असताना सैयद हुसेन रजा जैदी जिन्ना पदव्युत्तर मेडिकल सेंटरमध्ये जीवनासाठी संघर्ष करीत होता. सैयद काजिम रजा जैदीच्या कुटुंबासाठी विजयाचा जल्लोष शोकसागरात बदलला. कारण जल्लोष करताना बेभान झालेल्या चाहत्याने केलेल्या गोळीबारामध्ये त्यांच्या मोठ्या मुलाचे जीवन संपविले. ही केवळ एकमेव घटना नसून देशातील अनेक भागांमध्ये अशा प्रकारच्या घटनांमध्ये लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. कराचीमध्ये जवळजवळ १२ व्यक्ती जखमी झाल्यानंतर खायबर पख्तूनख्वामध्ये हवेत झालेल्या गोळीबारामध्ये लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. हुसेन त्यावेळी आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये उभा राहून आतषबाजी बघत होता. त्याने आपल्या वडिलांना म्हटले की, ‘पापा, काही लोक पाकिस्तान चॅम्पियन झाल्यामुळे गोळीबार करीत आहेत.’ काजिमने आपल्या मुलाला आत येण्यास सांगितले. तो जसा आत आला त्याने ओरडून सांगितले की, पापा, मला गोळी लागली आहे.’हुसेनचे काका सैयद हसन रजा जैदी म्हणाले, हे त्याचे अखेरचे शब्द होते. हुसेनचे आईवडील त्याला घेऊन जेपीएमसीमध्ये गेले, पण तोपर्यंत बराच रक्तस्राव झाला होता. रात्री २ वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला. (वृत्तसंस्था)
पाकमध्ये जल्लोषात १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
By admin | Published: June 21, 2017 12:50 AM