लंडन : इंग्लंडमधील एका स्थानिक साखळी सामन्यात चेंडू छातीवर आदळल्याने युवा क्रिकेटपटूला जीव गमवावा लागला. हा सामना सर्रे येथे खेळवण्यात येत होता. बावलन पद्मनाभन असे मृत खेळाडूचे नाव आहे. तो २४ वर्षांचा होता. तो ब्रिटिश तामिळ लीगमध्ये मनिपे पॅरिश स्पोर्ट्स क्लबसाठी फलंदाजी करीत होता. चेंडू छातीवर आदळताच बावलन याला इस्पितळात हलविण्यासाठी एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली; पण त्याआधीच त्याने प्राण सोडला होता. मागच्या नोव्हेंबर महिन्यात गळ्यावर चेंडू आदळल्याने आॅस्ट्रेलियाचा फलंदाज फिल ह्यूज याचा करुण अंत झाला होता. त्यानंतर कोलकाता येथे मैदानावर घडलेल्या घटनेनंतर युवा क्रिकेटपटूला प्राण गमवावे लागले होते.तो म्हणाला,‘ मी ठीक आहे’!पद्मनाभनचा सहकारी जीवा रुक्षण हा दुसऱ्या टोकावर फलंदाजीसाठी उभा होता. रुक्षणने ‘कोलंबो मिरर’ ला दिलेल्या माहितीनुसार चेंडू पद्नाभनच्या छातीवर आदळताच मी त्याला विचारले ‘तू ठीक आहेस किंवा नाही!’ त्याने अंगठा वर करीत संकेत दिले, की सर्व काही ठीक आहे. लगेच तो एक दोन पावले मागे गेला आणि स्टम्पच्या मागे चक्क कोसळला. मनिपे पॅरिस स्पोर्ट्स क्लबने बावलनच्या मृत्यूबद्दल लिहिले, ‘इतक्या कमी वयात बावलनच्या निधनाने आम्ही हैराण आहोत.’ सर्रे क्लबचे सीईओ रिचर्ड गोल्ड म्हणाले, ‘‘क्लबवर बावलनच्या मृत्यूमुळे शोककळा पसरली. आम्ही सर्व जण त्याच्या कुटुंबीयाच्या दु:खात सहभागी आहोत.’’
चेंडू छातीवर आदळल्याने क्रिकेटपटूचा मृत्यू
By admin | Published: July 08, 2015 1:01 AM