कोलंबो : टीम इंडियाच्या नव्या कोचबाबतचा निर्णय क्रिकेट सल्लागार समितीच्या सल्ल्यानुसार सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याच्या वृत्ताला बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी दुजोरा दिला. आॅक्टोबर महिन्यात दक्षिण आफ्रिका भारत दौरा करणार आहे.द. आफ्रिकेचा भारतातील मुक्काम ७२ दिवसांचा असून, त्या काळात ४ कसोटी, ५ वन डे आणि ३ टी-२० सामने खेळले जातील. या दौऱ्याआधी संघाला नवे कोच मिळावेत; मात्र कोचचा निर्णय सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांचा समावेश असलेल्या सल्लागार समितीवर सोपविला असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. कुठल्याही संघासाठी पूर्णकालीन कोच किती गरजेचा आहे, हे सांगून ठाकूर म्हणाले, ‘‘कोचची नियुक्ती करण्यास वेळ लागला हे खरे आहे; पण सप्टेंबरमध्ये आम्ही कोचच्या नावाची घोषणा करू. रवी शास्त्री हे संघासोबत काही महिन्यांपासून संचालकपदावर आहेत आणि या काळात संघाने चांगली कामगिरीही बजावली. खेळाडूंचेदेखील शास्त्री यांच्याबाबतचे मत सकारात्मक आहे. आम्हाला पूर्णकालीन कोच नेमायचा झाल्यास प्रारूप काय असेल, याचा विचार करावा लागेल. शेवटी संघासोबत १० जणांना ठेवणे सोपे नाही.’’
कोचबाबत निर्णय पुढील महिन्यात : ठाकूर
By admin | Published: August 20, 2015 11:37 PM