ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1- कर्णधार विराट कोहली आयपीएल-१० मध्ये खेळणार की नाही, याचा निर्णय दुस-या आठवड्यात होईल. तो खांद्याच्या दुखापतीमुळे उपचार घेत असल्याचे बीसीसीआयचे मत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत अखेरच्या सामन्यास मुकलेल्या कोहलीच्या फिटनेसची स्थिती सांगताना बीसीसीआयने विराट रांचीत झालेल्या दुखापतीवर सध्या उपचार घेत असल्याचे सांगितले.
खेळण्याचा निर्णय दुस-या आठवड्यात होणार असल्याने कोहलीच्या पुनरागमनाची तारीख मात्र सांगता येणार नाही. भारतीय संघातील अनेक दिग्गज खेळाडू आयपीएलपासून यंदा दूर राहणार आहेत.
काहींना सुरुवातीच्या सामन्यातून विश्रांती हवी आहे. भारतात सामन्यांचे व्यस्त वेळापत्रक पार पडल्यानंतर या खेळाडूंना जूनमध्ये इंग्लंडमध्ये होणा-या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी विश्रांती हवी आहे.
फिट राहण्यासाठी विश्रांतीची गरज आहे. २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा भारतीय संघ विजेता असून, यंदा स्पर्धा पुन्हा जिंकण्याचा निर्धार व्य़क्त केला आहे. रायझिंग पुणे सुपर जायन्टस् पुणे संघाचा खेळाडू असलेला रविचंद्रन अश्विन हा हर्नियामुळे आयपीएलचे संपूर्ण सत्र खेळणार नाही. मुरली विजय, लोकेश राहुल हे देखील खांद्यावरील उपचारासाठी बाहेर पडले आहेत.
अश्विन आयपीएल खेळणार नसल्याचे बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने जाहीर केले. लोकेश राहुलला इंग्लंडमध्ये खांद्यावर श्स्त्रक्रिया करून घ्यायची आहे. मुरली विजयच्या डाव्या मनगटाला दुखापत असल्याने त्याच्यावरही शस्त्रक्रिया होणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि गुजरात लॉयन्सचा रवींद्र जडेजा हे सध्या विश्रांती घेत असल्याने सुरुवातीचे काही सामने खेळणार नाहीत. उमेश आणि जडेजा यांची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात निवड निश्चित मानली जात आहे. या दोघांनाही प्रत्येकी दोन आठवड्यांची विश्रांती देण्यात आली. जडेजाच्या बोटाला दुखापत असल्याने चेंडू फिरविणे कठीण जात आहे. उमेशच्या कंबरेत तसेच मांडीत लचक भरली आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि संघातील त्याचा सहकारी हार्दिक पांड्या यांना मात्र आयपीएल खेळण्यास फिट घोषित करण्यात आले आहे.