मुंबई : ‘‘रियो आॅलिम्पिकमध्ये मिश्र दुहेरीत कुणासोबत खेळायचे, याचा निर्णय मी स्वत: घेणार आहे.’’ जागतिक टेनिस क्रमवारीच्या दुहेरीत अव्वल स्थानावर असलेली सानिया मिर्झा हिने ही बाब स्पष्ट केली. क्रिकेट क्लब आॅफ इंडियाचे रविवारी आजीवन सदस्यत्व स्वीकारल्यानंतर सानियाने पत्रकारांशी चर्चा केली. या वेळी ती म्हणाली, ‘‘मी नंबर वन आहे. माझा मिश्र प्रकारातील पार्टनर कोण, याचा निर्णय मी स्वत: घेईन.’’ सानिया नंबर वन असल्याने पार्टनर निवडीचा अधिकार तिच्याकडे राखीव असेल, असे मत रोहन बोपन्ना यानेदेखील व्यक्त केले होते.२०१२च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये सानियाच्या जोडीदाराबद्दलचा वाद चांगलाच गाजला. तशीच स्थिती पुन्हा उद्भवू शकते. बोपन्ना-पेस हे यंदा ग्रॅण्डस्लॅममध्ये चांगले खेळले. पेसने २०१५मध्ये तीन ग्रॅण्डस्लॅम जिंकली. बोपन्नाने विम्बल्डनच्या पुरुष सेमीफायनल आणि अमेरिकन ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळविले होते. लंडन आॅलिम्पिकदरम्यान झालेल्या वादावर पेस-सानिया हे मिश्र प्रकारात आणि भूपती-बोपन्ना हे दुहेरीत खेळतील, असा तोडगा काढण्यात आला होता. सानिया म्हणाली, ‘‘यंदादेखील अशीच स्थिती आहे. आमच्याकडे अधिक महिला खेळाडू नाहीत; पण वाद उद्भवणार नाही, अशी आशी करू या.’’जोडीदार निवडण्याचे निकष काय असतील, असे विचारताच ती म्हणाली, ‘‘आॅलिम्पिकला अद्याप वर्ष आहे. यादरम्यान कोण कसा खेळ करतो, हे पाहावे लागेल.’’ आॅलिम्पिक ही टेसिनपटूंसाठी विशेष स्पर्धा नसल्याचे सांगून सानिया म्हणाली, ‘‘टेनिसमध्ये वर्षभर ज्या स्पर्धा होतात, त्याप्रमाणे ती एक स्पर्धा असेल. विशेष तयारी करण्याचेदेखील कारण नाही. जय-पराजयानंतरही टेनिस खेळतच राहणार असल्याने आॅलिम्पिकचे दडपण नाही.’’कॅलेंडर वर्षात दोन ग्रॅण्डस्लॅम जिंकल्यानंतर जोडीदार स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस हिला ‘लकी गर्ल’ मानले जात असले, तरी सानियाचा त्याला आक्षेप आहे. ती म्हणते, ‘‘माझ्या यशात हिंगीसचा एकमेव वाटा आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. हिंगीसने गेल्या काही वर्षांत स्लॅम जिंकलेले नाही. दुसरीकडे, मी व्हेस्रिनासोबत जिंकण्याच्या काठावर होते, तर कारा ब्लॅकसोबत डब्ल्यूटीए टूर चॅम्पियनशिप जिंकले. यामुळे एक जोडीदार दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हे ठरविणे शक्य नाही.’’हिंगीसबद्दल २८ वर्षांची सानिया म्हणाली, ‘‘मी आणि मार्टिना सोबत चांगला खेळ करीत आहोत. आम्हा दोघींना दडपणात खेळणे आवडते. यंदा ५० सामने आम्ही जिंकले.’’ राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या सानियाने भारताच्या झेक प्रजासत्ताकाकडून डेव्हिस चषकात झालेल्या पराभवाबद्दल खेद व्यक्त केला. ती म्हणाली, ‘‘रोहण आणि लिएंडर हे सामना जिंकतील, अशी मला खात्री होती. पण, झेक संघाचेही तगडे आव्हान होतेच. राडेक स्टेपनेकसारखा दमदार खेळाडू पाहुण्या संघात होता; पण भारताच्या पराभवाबद्दल मी फार नाराज आहे.’’ (वृत्तसंस्था)
आॅलिम्पिक जोडीदाराचा निर्णय स्वत: घेईन
By admin | Published: September 21, 2015 11:46 PM