हरारे : झिम्बाब्वे संघाविरुद्ध शतकी खेळी केल्याने माझा आत्मविश्वास वाढला आहे. निवड समितीने जो माझ्यावर विश्वास दाखविला तो मी सार्थक ठरविला आहे. आपल्या कामगिरीवर समाधानी असल्याचे भारतीय संघाचा फलंदाज केदार जाधवने वृत्तसंस्थेला सांगितले. केदार म्हणाला, की तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत व्हाईट वॉश देऊ असे वाटले नव्हते. त्यांच्या घरच्या मैदानावर तिन्ही वेळा प्रथम फलंदाजी करून अडीचशे धावांचा टप्पा गाठणे आव्हानात्मक होते. त्यामुळे या विजयाचे श्रेय फलंदाजांनाच जाते. तिसऱ्या सामन्यात ८७ चेंडंूत नाबाद १०५ धावा टोलविलेल्या केदारचा हा तिसरा एकदिवसीय सामना होता. ज्या वेळेस खेळपट्टीवर पाऊल ठेवले, तेव्हा भारताच्या खात्यात ४ बाद ८२ धावा जमा होत्या. अशा बिकट परिस्थितीत त्याने मनीष पांडेच्या साथीत १४४ धावांची भागीदारी करून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. अशाच एका संधीची मीदेखील वाट पाहत होतो. येथील खेळपट्टीवर प्रत्येक सामन्यात धावा वसूल करणे अवघड असल्याची मला जाणीव होती. मला फलंदाजीची संधी मिळाल्यास खेळपट्टीवर शेवटपर्यंत टिकाव धरून संघाच्या विजयासाठी खेळ करण्याचे मी मनोमन ठरविले होते. (वृत्तसंस्था)
निवड समितीचा विश्वास सार्थक ठरविला : केदार जाधव
By admin | Published: July 17, 2015 3:39 AM