नागपूर : जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिका संघासाठी भारत दौरा खडतर ठरत आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज डेल स्टेन दुखापतग्रस्त असल्यामुळे मालिकेत १-०ने पिछाडीवर असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. डेल स्टेनने सोमवारी नेट््समध्ये काही वेळ गोलंदाजी केली; पण त्याच्या फिटनेसबाबत अद्याप काही सांगता येणार नाही, असे त्याचा सहकारी मोर्ने मोर्कलने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. स्टेनने सोमवारी गोलंदाजीचा सराव केल्यामुळे तिसऱ्या सामन्यात त्याच्या समावेशाबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत. मोर्कल म्हणाला, ‘स्टेनला गोलंदाजीचा सराव करताना बघितल्यानंतर आनंद झाला. त्याच्या दुखापतीमध्ये सुधारणा होत असल्याचे संकेत मिळत आहेत; पण संघातील त्याच्या समावेशाबाबतचा निर्णय तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी बुधवारी सकाळी घेण्यात येईल.’पाच वर्षांपूर्वी याच मैदानावर स्टेनने १० बळी घेत दक्षिण आफ्रिका संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. स्टेनच्या समावेशाचा निर्णय संघाचे वैद्यकीय अधिकारी घेतील, असे मोर्कल म्हणाला. मोर्कल म्हणाला, ‘स्टेनबाबतचा अंतिम निर्णय वैद्यकीय अधिकारी घेतील. सामन्यादरम्यान दुखापत उफाळून आली तर संघाच्या ताळमेळावर प्रभाव पडतो. स्टेन खेळण्यासाठी उत्सुक असून, तो फिट होईल, अशी आम्ही प्रार्थना करतो.’चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर असलेला दक्षिण आफ्रिका संघ जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. आगामी सामन्यांमध्ये संघाकडून चमकदार कामगिरीची आशा आहे. मोर्कल म्हणाला, ‘ड्रेसिंग रुममधील माहोल सकारात्मक आहे. पहिल्या कसोटी सामन्यात आम्हाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही; पण उद्या, बुधवारपासून खेळल्या जाणाऱ्या लढतीत आम्ही नव्याने सुरुवात करण्यास प्रयत्नशील आहोत.’ (वृत्तसंस्था)
स्टेनबाबत निर्णय उद्या सकाळीच : मोर्कल
By admin | Published: November 24, 2015 12:18 AM