ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 13 - कर्णधारपद स्वीकारल्यापासून विराट कोहली दिवसेंदिवस अधिकाधिक प्रगल्भ होत आहे. त्याची फलंदाजी बहरत असतानाच प्रत्येक सामन्यात त्याचे नेतृत्वगुणही समोर येत आहेत. आज आटोपलेल्या बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीतही विराटच्या नेतृत्वातील चातुर्य पाहायला मिळाले. विराटच्या त्या चातुर्यामुळे पंचांनाही आपला निर्णय बदलावा लागला.
बांगलादेशने कालच्या 3 बाद 103 वरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यावर भारताच्या गोलंदाजांनी झटपट विकेट काढत संघाला विजयासमीप पोहोचवले. तस्किन अहमद आणि कमरूल इस्लाम रब्बी ही बांगलादेशची अखेरची जोडी मैदानात होती. त्यावेळी अश्विनने टाकलेल्या 101 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर तस्किन अहमद झेलबाद असल्याचे अपील भारतीय क्षेत्ररक्षकांनी केले. त्यावेळी निर्णय देण्यासाठी मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. मात्र रिप्लेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जाण्यापूर्वी जमिनीला लागल्याचे दिसल्याने पंचांनी तस्किन नाबाद असल्याचा निर्णय दिला.
पण पंचांनी रिप्लेमध्ये फक्त झेल आहे की नाही तेच पाहिले. फलंदाज पायचीत होता की नाही हे तपासले नाही. त्यामुळे विराटने पायचीतसाठी दाद मागितली. मग पुन्हा रिप्ले पाहिल्यावर फलंदाज पायचीत असल्याचा निर्णय पंचांनी दिला. त्याबरोबरच बांगलादेशचा डाव गुंडाळत भारताने सामना जिंकला.